नागपूर विद्याापीठ : शिक्षकांचा अभाव, १ आॅक्टोबर रोजी बैठक आशीष दुबे - नागपूरशिक्षकांच्या अभावामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत हिवाळी परीक्षा कशा होणार, असा परीक्षा विभागासमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. माहिती सूत्रानुसार विद्यापीठाला लेखी परीक्षेपूर्वी आंतर मूल्यांकन व प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परंतु विधानसभा निवडणुका व शिक्षकांच्या अभावामुळे त्यावर तोडगा कसा काढावा, अशा विचारात परीक्षा विभाग सापडला आहे. यावर समाधान शोधण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने १ आॅक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकारी, परीक्षा मंडळ व अभ्यास मंडळाच्या सदस्यांची एक बैठक बोलाविली आहे. या बैठकीत हिवाळी परीक्षांसह उन्हाळी परीक्षांचे निकाल व पुनर्मूल्यांकनावर विचारमंथन होणार असल्याची माहिती आहे. विद्यापीठातील सद्यस्थिती लक्षात घेता, या संकटावर सहज तोडगा निघणे कठीण आहे. अगोदरच उन्हाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागले आहेत. शिवाय पाचव्या टप्प्यातील निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षक अजूनही उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात व्यस्त आहेत. काही शिक्षक आपल्या महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आटापिटा करीत आहे. यामुळे विद्यापीठाला परीक्षेशी संबंधित कामासाठी शिक्षक मिळणे कठीण झाले आहे. हिवाळी परीक्षेची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर द्यावी, असा परीक्षा विभागापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. परीक्षा विभागासमोर पेच विद्यापीठाच्या कार्यक्रमानुसार लेखी परीक्षांच्या किमान महिनाभरापूर्वी प्रत्याक्षिक व आंतर परीक्षा घेणे आवश्यक असते. यामुळे विद्यापीठाला वेळेवर निकाल जाहीर करणे सोपे जाते. परंतु माहिती सूत्रानुसार विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाला यंदा या परीक्षा अगोदर घेणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षा विभागातील अधिकारी लेखी परीक्षेनंतर त्या घेण्याचा विचार करू लागले आहेत. निवडणूक काळात बहुतांश शिक्षक निवडणूक कामात व्यस्त राहणार आहे. त्यामुळे ते परीक्षेसाठी पूर्ण वेळ देऊ शकणार नाही.
हिवाळी परीक्षा संकटात!
By admin | Published: September 21, 2014 1:17 AM