अल्पेश करकरे -मुंबई - कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया, या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडणार, अशी चर्चा होती. मात्र 25 नोव्हेंबरला हे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत 22 ते 28 डिसेंबरला होणार, असे आघाडी सरकारने स्पष्ट केले. यामुळे आता येत्या बुधवारपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. त्या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजनार आणि कसे असेल हे अधिवेशन? पाहुया...कोणते मुद्दे गाजणार ?मुंबईत 22 डिसेंम्बरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण, पेपर फुटी प्रकरण व परीक्षेस होणारा विलंब, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना, मुख्यमंत्री कारभार,वीजबिल, लॉकडाऊन, एसटी संप, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला सुरक्षा, ncb व ED च्या कारवाया, तसेच इतर मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. तसेच आघाडी सरकारच्या कारभारावर व नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
असे असेल सदनातील कामकाज -बुधवार, २२ डिसेंबर २०२१ – अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे, सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्या सादर करणे, शासकीय कामकाज, शोक प्रस्ताव.
गुरुवार २३ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा प्रस्ताव
शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ – सन २०२१-२२ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला व शेवटचा दिवस), शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज विधेयके.
शनिवार २५ डिसेंबर २०२१ – सुट्टी
रविवार २६ डिसेंबर – सुट्टी
सोमवार – २७ डिसेंबर २०२१ – पुरवणी विनियोजन विधेयक, शासकीय कामकाज, अंतिम आठवडा प्रस्ताव.
मंगळवार – २८ डिसेंबर २०२१ – शासकीय कामकाज, सत्तारुढ पक्षाचा प्रस्ताव
दोन डोस घेतलेल्यानाच प्रवेश; आरटीपीसीआर अनिवार्य -यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधिमंडळ सदस्य, त्यांचे सरकारी स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली होती.विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार?विधानसभा अध्यक्षांची जागा अद्यापही रिक्त आहे. विना विधानसभा अध्यक्ष असे हे तिसरे अधिवेशन असेल. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन विना अध्यक्षच पार पाडण्यात आले. पंरतू या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होईल, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. अद्यापही राज्य सरकारमध्ये अनेक आमदारांनी लसीचे दोन डोस घेतले नाही आहेत. तसेच कामकाज समितीने दोन लसीचे डोस घेतली नसतील त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली आहे. यामुळे काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
विरोधकांना थोपण्यासाठी सत्ताधाऱ्यांची रणनीती -या अधिवेशनात विरोधकांकडून होणारे विविध विषयांवरील प्रश्न आणि नेत्यांवर होणारे आरोप याचे पडसाद सभागृहात उमटतील. त्यात अधिवेशनात विरोधक अधिकच आक्रमक होण्याची शक्यता असल्याने विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तयारी केली आहे . तर विरोधकांना थोपण्यासाठी सत्ताधारी पक्षातील तिन्ही पक्षांनी एकमेकांना सभागृहात विषय हाताळण्यास सहकार्य करण्याचे ठरवले आहे, अशी माहीती मिळत आहे. तसेच फडणवीस सरकारच्या काळातील गैरव्यवहार उघडकीस आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.