नागपूर: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून वादळी ठरत आहे. आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्ररणी आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आज सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, ''आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या सभागृहात काम करत आहोत. माझ्यासह छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक जेष्ठ मंडळी आहेत. अशाप्रकारचे वक्तव्य अजानतेपणाने जाऊ नये अशा स्वभावाचे आम्ही आहोत. जे घडलं ते घडायला नको होतं. या वक्तव्यावरुन अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.''
चर्चेदरम्यान चुकून शब्द जातो''सभागृहात अशाप्रकारच्या चर्चेदरम्यान अनेकदा चुकून शब्द जातो. नंतर कळतं की, हे नको व्हायला हवं होतं. मी विरोधीपक्षाचे प्रतिनिधित्व करतो, आमचीही भूमिका असते. अनेकदा खटके उडतात, आरे ला कारे होतं. यापूर्वी पावसाळी अधिवेशनात आम्ही सभागृहात सर्वांचा मानसन्मान ठेवला. कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे असे काम केले. आताही अनेक कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. तुम्हीही या गोष्टीचे साक्षीदार आहात.''
गैरसमज करुन घेऊ नका''आता तुम्ही एक निर्णय घेतला आहे. जे काही घडलं ते जयंतराव पाटील यांच्याकडून घडलं. पण विरोधपक्षनेता या नात्याने मी त्यांच्यावतीने दिलगिरी व्यक्त करतो. हे निलंबन मागे घ्या म्हणून नाही, पण राज्यात आमच्याकडून चांगला मेसेज जावा हा आमचा हेतू आहे. आजचा दिवस चांगला जाणार नाही, पण उद्याची नवीन पहाट चांगल्या हेतूने व्हावी अशी विनंती सत्ताधारी पक्षाला करतो. आपल्या भावना दुखवल्या गेल्या, त्याचा आदर केलाच पाहिजे. तिथे बसणाऱ्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि तो कायम असणार. आमच्या अध्यक्षांच्या बाबतीत गैरसमज करुन घेऊ नका,'' असे म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.