राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हेदेखील सभागृहात दिसणार आहेत.
नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. तसेच नवाब मलिक अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात देखील गेले होते. त्यामुळे नवाब मलिक शरद पवार गटाला पाठिंबा देणार की अजित पवार गटाला याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर बहुतांश आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेल्या जामिनानंतर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक नक्की कोणत्या गटात जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले मलिक हे सध्या जामिनावर बाहेर असून अनेक दिवसांनी ते सभागृहात दिसतील.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्या. आपसात समन्वय ठेवा. कोणत्याही पद्धतीने सरकारवर नामुष्की येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सहकारी मंत्र्यांना दिला. दोन्ही सभागृहात मंत्री नसल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागण्याची पाळी सरकारवर गेल्या अधिवेशनात तीन-चार वेळा आली होती. विरोधकांनी त्यावेळी सरकारला धारेवर धरले होते. संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात नसल्यामुळे त्यांच्या विभागाची उत्तरे अन्य मंत्र्यांनी दिली, असे यावेळी काहीही घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांनी बजावले.
विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी वेगळी बैठक
विरोधी पक्षांनी आजच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकताना जे पत्र त्यांना दिले ते पत्र समोर ठेवून मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ मंत्री यांची वेगळी बैठक रामगिरीवर झाली. एकेका मुद्द्यावर पत्र परिषदेत काय बोलायचे याची रणनीती ठरवण्यात आली. त्यामुळेच आजच्या पत्रपरिषदेत तिघांमध्ये समन्वय दिसून आला. तिघांपैकी कोणी कोणत्या विषयावर बोलायचे हे आधीच ठरलेले होते. त्यानुसार पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले.