मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आहे. दहा शहरांमध्ये सातारा, बारामती, नाशिक, बीड, परभणी, पुणे, जळगाव, चिखलठाणा आणि नांदेडचा समावेश असून, मुंबई मात्र अजूनही थंडीच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईचे किमान तापमान रविवारी २२.४ अंश सेल्सिअस होते, ते १६ अंशांखाली येत नाही, तोपर्यंत मुंबईला थंडी अनुभवता येणार नाही.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार २५, २६ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशांच्या आसपास राहील.स्कायमेटच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांतील शहरेही गारठत आहेत. येथील काही शहरांचे किमान तापमान १० ते १२ अंशांच्या आसपास आहे. उत्तर भारतामधील पर्वतरागांत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तरेकडून वाहत असलेल्या हवेमुळे या शहरांचे किमान तापमान खाली घसरत आहे. थंड हवेचा प्रभाव पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार या राज्यांवर आहे.
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे गारठताहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 8:22 AM