दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही; जयंत पाटलांचा खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:13 PM2023-12-11T16:13:10+5:302023-12-11T16:19:21+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय आणि उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरूनही पाटील यांनी आपल्या खास शैलीत दोघांनाही टोला लगावला आहे.
"बळीराजा गारपीट आणि अवकाळी पावसाचा मारा सहन करत असताना सत्ताधारी मात्र शेजारच्या राज्याच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त होते. इतर राज्यांत प्रचार करण्यास आमची हरकत नाही. पण इथं आपला संसार फाटला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्यात संसार जोडण्यासाठी जात आहेत. हे चित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरं नाही. तुमचा तिकडं विजय झाला, याचा आम्हाला आनंद आहे. पण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक इमेज असल्यामुळे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं?" असा खरपूस सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.
"आपले मुख्यमंत्री प्रचारासाठी तिकडे गेले, एक उपमुख्यमंत्रीही गेले. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री गेले नाहीत," असं जयंत पाटील यांनी म्हणताच अजित पवारांनीही उत्तर दिलं. "मी तिकडे जाऊन काय दिवे लावणार होतो? जे आहे ते मोदींच्या नावावर आहे," असं अजित पवार म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत जयंत पाटील म्हणाले की, "मी पण तेच म्हणतोय...जे दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही."
"नितीन गडकरींच्या अनुपस्थितीत सरकारने घेतला तो निर्णय"
केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभर फिरून सांगत आहेत की, आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन वाचवत आहोत. मात्र हेच गडकरी बैठकीत नसताना नुकतंच केंद्र सरकारने उसापासून तयार करण्यात आलेले इथेनॉल न घेण्याचा निर्णय घेतला. तुम्हीच व्याजदर कमी करून कर्ज देत इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं होतं. मात्र आता साखरेचा भाव वाढतोय, हे लक्षात येताच इथेनॉल बंदी केली. सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचं ठरवलं आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं आहे.