२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:01 IST2024-12-18T09:00:52+5:302024-12-18T09:01:38+5:30

शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो असं अजितदादांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी माध्यमांना सांगितले. 

Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days | २ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

नागपूर - राज्यात हिवाळी अधिवेशनानिमित्त सगळेच मंत्री, आमदार नागपूरात आहे. नागपूरातील थंडीत अधिवेशनामुळे गरमागरम राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार २ दिवस नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या झळकल्या. त्यानंतर बुधवारी सकाळीच शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

नागपूरमधील अजित पवारांचे शासकीय निवासस्थान विजयगड येथे शिंदेंनी अजितदादांची भेट घेतली. या भेटीनंतर शशिकांत शिंदे म्हणाले की, मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. राजकारणात व्यक्तिगत संबंध असतात, आपलेपणा असतो. त्यातून भेटलो बाकी कुठलीही राजकीय चर्चा नाही. लोकप्रतिनिधी आमदार म्हणून भेटायला जावं लागते. परंतु चर्चा केली नाही. शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे होत्या. बरेच कार्यकर्ते अजितदादांना भेटायला आले होते. कोण खासदार, आमदार त्यांच्या संपर्कात आहेत माहिती नाही. शरद पवारांसोबत जे आहेत त्यांच्यासाठी पवारांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो. अजितदादांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. २ मिनिटांची भेट झाली, शुभेच्छा दिल्या आणि निघालो बाकी काही नाही असं त्यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या पहिल्या २ दिवसांत दादा गायब

मंत्रिमंडळ विस्तारानंतर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या सुरुवातीच्या २ दिवशी अजित पवार सभागृहातील कामकाजात सहभागी नव्हते. त्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी समोर आली आहे.भुजबळ यांची नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नॉट रिचेबल झाल्याचं बोलले गेले. दादा २ दिवस कुणाला भेटले नाहीत. कार्यकर्ते, नेत्यांनाही अजित पवारांची भेट झाली नाही. सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. माजी मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार यांची मंगळवारी भेट घेतली त्यानंतर अजितदादांना घशाचा संसर्ग झाला आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. 

 'योग्य वेळ, योग्य निर्णय! 

महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचे बोलले जात आहे. हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. 

Web Title: Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.