ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2016 या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेतील प्रलंबित दोन विधेयके व विधान परिषदेतील सहा प्रलंबित विधयेकांवर चर्चा होणार असून चार नवीन आणि 11 प्रख्यापित अध्यादेशांवर चर्चा होणार आहे.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली.
या बैठकीत विधीमंडळाचे अधिवेशन दोन आठवड्याचे ठेवण्याचे ठरविण्यात आले. पाच डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत विविध विधेयके, शासकीय कामकाजावर चर्चा होणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त विशेष चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी दिली.