ठळक मुद्देएक कार व दुचाकी, वायर कापण्यासाठी लागणारे कटर जप्त१० ते १२ जण असून गुन्हा केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जात असल्याचे समोर रेल्वेची सिग्नल यंत्रणा प्रभावित करत चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ
पुणे : राज्यात विविध ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यानंतर प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळींपैकी तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली आहे. रोहित गणेश रारेभात, बाबू मोहन कसबे, विनोद सखाराम जाधव (तिघेही रा. जामखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीमध्ये १० ते १२ जणांचा समावेश असून त्यांनी मागील तीन ते चार महिन्यात राज्यभरात ३६ ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यावर प्रवाशांना लुटल्याचे समोर आले आहे़. त्यांच्याकडून एक कार व दुचाकी, वायर कापण्यासाठी लागणारे कटर जप्त करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त डी़ विकास, सहायक सुरक्षा आयुक्त बी़ के़ मकरारिया यांनी माहिती दिली़. मागील काही दिवसांपासून सातारा, पुणे विभागात कटरच्या साह्याने सिग्नल वायर कापून रेल्वेची सिग्नल यंत्रणा प्रभावित करत चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करूनही या घटनांमध्ये वाढ झाली होती. १३ सप्टेबर रोजी पुणे सातारा विभागातील पळशी स्टेशनवर पुन्हा अशी घटना घडली होती. त्याअनुषंगाने सातारा येथील आरपीएफ निरीक्षक यांनी या घटनांचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा चोरी करणारे १० ते १२ जण असून गुन्हा केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जात असल्याचे समोर आले. त्यानंतर आरपीएफचे निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील जीआरपी व सातारा येथील आरपीएफच्या संयुक्त पथकाने नाशिक परिसरात त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली. तिघांनीही या घटनांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे़.या ३६ गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली असून त्यात किती माल चोरीला गेला होता, याचा शोध घेतला जात आहे़.
चोरीसाठी वापरायचे रेल्वे अॅपचोरी करावयाच्या ट्रॅकवर कोणती रेल्वे येणार आहे. हे पाहण्यासाठी तिघेही मोबाईलवरून त्या ट्रॅकवरील रेल्वेचे लोकेशन पाहत असत. त्यानंतर ती जवळ आली की रेल्वेची सिग्नल वायर कापत. वायर कापल्यावर रेल्वेला लाल सिग्नल दिसला की रेल्वे थांबल्यावर आतील प्रवाशांच्या मोबाईल, सोने यांवर डल्ला मारत असत. आपली ओळख पटू नये, म्हणून ते गुन्हा करावयाच्या जागेपासून २ ते ३ किमी अगोदर मोटार, दुचाकी पार्क करीत व तेथून चालत जाऊन गुन्हा करीत असत़.