१९७२ नंतर महाराष्ट्रात, तसेच भारतात मोठे परिवर्तन सुरू झाले. विविध अशा प्रकारच्या चळवळी सुरू झाल्या. या चळवळींनी जीवनाची बहुविध क्षेत्रे व्यापून टाकली. त्यातल्या तरुणांच्या प्रमुख दोन चळवळी होत्या. त्यापैकी ‘युवक क्रांती दल’ एक होती. महात्मा गांधी यांचा विचार, समाजवादी मूल्यसरणी या आधारे ‘युवक क्रांती दल’ ही संघटना कार्य करीत होती. ‘युक्रांद’ प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये काम करीत होती. तरी तिने इतर प्रश्नांसंदर्भातही लढे दिले आहेत.
दुसरी अत्यंत महत्त्वाची चळवळ म्हणजे ‘दलित पँथर’. ही चळवळ डॉ. आंबेडकरांना प्रेरणास्थानी मानणारी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचे ध्येय बाळगणारी चळवळ होती. पुढे आदिवासी चळवळ सुरू झाली. स्त्रियांच्या चळवळी सुरू झाल्या. शेतकरी संघटनेची चळवळ सुरू झाली. या साऱ्या चळवळींना देश बदलून टाकायचा होता. त्यासाठी या संघटनांमधील तरुण कुठलाही संघर्ष करायला तयार होते. विशेषत: ‘युक्रांद’ आणि ‘दलित पँथर’मध्ये तत्कालीन युवक सहभागी झाला होता. अशा भारलेल्या काळात उत्साहाने सळसळणारे एक व्यक्तिमत्त्व तरुणांना प्रेरणा देत होते, स्वत: कार्य करीत होते, ते म्हणजे डॉ. भालचंद्र मुणगेकर. ते वरील दोन्ही चळवळींशी संबंधित होते. मीही ‘युक्रांद’च्या जवळचा होतो; परंतु ‘दलित पँथर’ची चळवळ मला माझी वाटत होती. या समान धाग्यामुळे मराठवाड्यात असणारा मी आणि मुंबईत असणारे डॉ. भालचंद्र मुणगेकर मनाने खूपच जवळ आलो.
आज डॉ. भालचंद्र मुणगेकरांना आपण अनेक नात्यांनी ओळखतो. त्यांची पहिली ओळख म्हणजे भारतीय अर्थशास्त्राचे, तसेच राजकीय अर्थशास्त्राचे तज्ज्ञ. मुंबई विद्यापीठात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे ‘इंडियन इकॉनॉमी इन दी न्यू मिलेनियम’ आणि ‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड’ हे दोन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. ‘दी इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्रा’ या ग्रंथाचे मोल लक्षात घेऊन अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहनसिंग या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आले होते. अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळेच ते भारत सरकारच्या ‘कृषी खर्च व मूल्य आयोगाचे’ काही काळ सदस्य होते. पुढे २००४ ते २००९ या कालावधीत ते भारताच्या ‘नियोजन आयोगाचे’ सदस्य होते. २००० ते २००४ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुठलेही पद हे कार्य करण्यासाठी असते, केवळ मानमरातबासाठी असत नाही, याची जाणीव डॉ. भालचंद्र मुणगेकरांना असल्यामुळे त्यांनी नव्याने अनेक उपक्रम सुरू केले. ते आजही विद्यापीठात सुरू आहेत. त्यांनी काही नव्या विभागांचा प्रारंभ केला. विशेषत: लोककलांच्या अभ्यासाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे एक कुशल प्रशासक व एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची प्रतिमा भारतभर उभी राहिली. त्यामुळेच महाराष्ट्राबाहेरील दोन विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट देऊन गौरव केला.
त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मा. राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती राज्यसभेवर खासदार म्हणून केली. डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. जे. एम. वाघमारे राज्यसभेत गेल्यानंतर त्यांनी अनेक चर्चांमध्ये भाग घेतला. काही महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या मुणगेकर आज पंचाहत्तर वर्षांचे झाले आहेत; पण सतत नवनव्या कामात स्वत:ला गुंतवून घेणे आणि सतत उत्साही राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोकणी माणसाची जिद्द आणि चिवटपणा जसा त्यांच्यात आहे, त्याप्रमाणेच राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांसाठी संघर्षरत राहण्याची जिद्दही त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सुधारणांचा मानवी चेहरा शोधावासा वाटतो, तसेच भारताच्या विकासाचे राजकीय अर्थशास्त्र मांडावेसे वाटते. आजच्या सामाजिक, राजकीय प्रश्नांच्या अनुषंगाने ‘इंधन’ पुरवावसे वाटते. आपल्या जीवनाचाही शोध घ्यावासा वाटतो. त्यातून ‘मी असा घडलो’ हे त्यांचे आत्मकथनही प्रकाशित झाले आहे. त्याच्या पुढचा भाग ते लिहीत आहेत. याचा अर्थ असा की, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि विचारवंत या नात्याने आपण डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना ओळखतो. असे सगळे असले तरी या साऱ्या कार्याच्या मुळाशी असणारा मुख्य कंद कोणता असेल तर तो समताधिष्ठित समाजरचनेचा ध्यास घेणारा एक अस्वस्थ चिंतक कार्यकर्ता हाच आहे.या मूळ पिंडामुळेच ते बुद्धिझमच्या अभ्यासाकडे वळले आहेत. आज बुद्धिझमसंदर्भात ते जागतिक पातळीवर कार्य करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अभ्यासाकडे वळले आहेत. यासंदर्भातील त्यांचे कार्य पाहता ते डॉ. आंबेडकर विद्येचे स्कॉलर आहेत, असे मी म्हणेन. ‘प्राच्यविद्या’, ‘महाराष्ट्र विद्या’, ‘इंडॉलॉजी’ हे जसे स्वतंत्र अभ्यासाचे विषय होऊ शकलेले आहेत, त्याप्रमाणे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र संशोधनाचे म्हणजेच ‘विद्येचे’ विषय होऊ शकतात, असे माझे मत आहे. असे विषय उद्या शासनाने अगर एखाद्या विद्यापीठाने सुरू केले, तर तेथे या विद्येचे तज्ज्ञ म्हणून केवळ भालचंद्र मुणगेकर यांचेच नाव घ्यावे लागेल.समतेसाठी कायम संघर्षरत राहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वास पंचाहत्तरीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!