कसारा : शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या १,१०१ सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल शंभरहून अधिक जोडपी अगोदरच विवाहबद्ध झालेली होती. काही जोडपी तर आपल्या चिमुरड्यांना कडेवर घेऊन विवाहमंडपात दाखल झाली होती.
खा. कपिल पाटील फाउंडेशन, हिंदू सेवा संघ आणि राघोजी भांगरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहापुरात रविवारी आदिवासींच्या ११०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार किसन कथोरे, आ. निरंजन डावखरे, आ. नरेंद्र पवार, आ. गणपत गायकवाड, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.विवाह सोहळ्यात अगोदरच लग्न झालेली तब्बल १00 पेक्षा जास्त जोडपी सहभागी झाली होती. काही जोडप्यांच्या कडेवर चक्क वर्ष ते दोन वर्षे वयाची मुलंही होती. या जोडप्यांना त्यांची नावे विचारली असता, त्यांनी सांगितली नाही. आम्हा गरिबांना भांडी, कपडे मिळणार आहेत, असे सांगितल्याने आम्ही तयार झालो, असे त्यांनी सांगितले.