नाशिक- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 11 जागांवर 20 मे रोजी मतदान होणार असून त्यात नाशिक, दिंडोरी आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरल्याने उद्या म्हणजेच 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा नाशिक मध्ये होणार आहेत.
उद्या दुपारी एक वाजता निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 15 आणि 16 मे असे दोन दिवस नाशिक आणि दिंडोरी येथे प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय गटाचे नेते जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी च्या अजित पवार गटाचे नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील मतदारसंघांमध्ये बैठका घेणार आहेत. जळगाव येथील मतदान पार पडल्याने भाजपाचे नेते गिरीश महाजन तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील पुढील आठ दिवस नाशिक मध्ये तळ ठोकून बसणार आहेत
नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पंकजा मुंडे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे.