पुणे : जिल्ह्यात तब्बल १,८२८ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे बालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सोय व्हावी, या दृष्टीने माझा प्रयत्न असून, त्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे नवनिर्वाचित महिला व बाल कल्याण समिती सभापती राणी शेळके यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात ४ हजार ६०३ अंगणवाड्या आहेत. त्यांपैकी २ हजार १५ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. मात्र, अद्याप जागेअभावी १ हजार ८२८ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अंगणवाड्या बांधण्यासाठी गायरान जमीन द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव लवकरच पाठविणार आहे. राज्य शासनाकडून एक अंगणवाडी बांधण्यासाठी जवळपास ६ लाख रुपये निधी दिला जातो. मात्र, जागेअभावी अंगणवाडी बांधता येत नाही. जिल्ह्यात सध्या खासगी जागेत ४७९ मंदिरात ९१, समाजमंदिरात १९४, प्राथमिक शाळेतील वर्गामध्ये ६८७, इतर ठिकाणी १४४ आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत १९१ अंगणवाड्या भरत आहेत. इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना आज समाजमंदिर, तर उद्या खासगी खोलीत बसावे लागते. काही गावांमध्ये अंगणवाड्या या भाड्याच्या खोलीत भरतात. काही अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जातो. अंगणवाड्यांमधील बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात जागेअभावी अनेक अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. गावागावांतील गायरान जमीन अंगणवाडी बांधकामासाठी मिळाल्यास अंगणवाड्यांच्या इमारतीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे येथील प्रशस्त अंगणवाड्यांमध्ये परसबागेसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. याबाबचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देणार आहे. त्याचबरोबर अनेक अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता अशा पायाभूत सुविधा नाहीत. या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि शिक्षिकांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देणार आहे.- राणी शेळके, सभापती, महिला व बाल कल्याण समिती
१,८२८ अंगणवाड्या इमारतींविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 12:49 AM