मुंबई : निळ्या झेंड्याशिवाय भगवी दिवाळी साजरे करणे अशक्य आहे. त्यामुळे सत्तेतील योग्य वाटा निवडणुकीपूर्वीच द्यावा, नाहीतर महायुतीला दिवाळीऐवजी शिमगा साजरा करावा लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)च्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. त्यासाठी रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार विचारमंथन सुरू आहे.याआधी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीत रिपाइंने महायुतीला इमानेइतबारे साथ दिल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही निवडणुकांत महायुतीला घवघवीत यश मिळाले. सत्ता मिळाल्यानंतर रिपाइंला सत्तेमध्ये वाटा देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र दिलेला शब्द महायुतीने अद्याप पाळला नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. परिणामी, निवडणुकीआधीच सत्तेतील वाटा निश्चित करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. ‘सत्ता आल्यानंतर त्याचे वाटे करू,’ अशा प्रतिक्रिया शिवसेनेच्या गोटातून उमटत आहेत. त्यामुळे महायुतीवर विश्वास नसल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘आधी योग्य वाटा द्या, नाहीतर दिवाळीऐवजी महायुतीला शिमगा साजरा करावा लागेल,’ असा इशाराही काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावर आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही योग्य वाटा मिळण्याबाबत कार्यकर्ते आणि समाजात संभ्रमाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अनिल कोकणे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
निळ्या झेंड्याशिवाय भगवी दिवाळी होणे शक्य नाही!
By admin | Published: September 15, 2014 4:26 AM