ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ४- एकेकाळी देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य असणारे, देशातील लाखो तरूणांना रोजगार देणारे महाराष्ट्र राज्य पिछाडीवर पडले असल्याचे सांगत महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले. मात्र बीडमधील सभेप्रमाणेच त्यांनी औरंगाबादमध्येही शिवसेनेवर बोलणे टाळले.
आघाडी सरकारने १५ वर्षांत महाराष्ट्र उध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात हा महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे, एकेकाळी गुजरात महाराष्ट्राकडे पाहून अनेक गोष्टी शिकला, मात्र आता तोच महाराष्ट्र राज्य पिछाडीवर आहे. साक्षरतेत महाराष्ट्राचा १२ वा क्रमांक आहे तर विकास दराच्या बाबतीत राज्य ६व्या स्थानावर आहे, इतर अनेक छोटी-छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे निघून जात असताना महाराष्ट्र मात्र मागेच राहिला असे सांगत हे सर्व आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता वातावरम बदलले असून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे ते म्हणाले.
औरंगाबादमध्ये पर्यटनाच्या खूप संधी असून अजिंठा-एलोराच्यामुळे देश-विदेशातलील पर्यटक येथे आकर्षित होतील, तरूणांना रोजगार मिळेल मात्र त्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गरीबांच्या फायद्यांसाठी काँग्रेसने बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मात्र बँकेत गरीब दिसतात का असा प्रश्न विचारत आमच्या सरकाराने गरीबांसाठी जन-धन योजना आणल्याचे व त्या अंतर्गत ३ हजार कोटी रुपये जमा झाल्याचे मोदींनी सांगितले. गेली ६० वर्ष ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी काही काम केले नसतानाही तेच लोक माझ्याकडे ६० दिवसांचा हिशोब मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.