नागपूर : व्यापार करणे सुलभ करण्यासाठी औद्योगिक, बँकिंग, मालवाहतूक आणि करप्रणाली यासंबंधीचे कायदे बदलणे गरजेचे आहे. अन्यथा भारताची आर्थिक प्रगती होणे अशक्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जनतेच्या आशा वाढल्या आहेत, असे प्रतिपादन न्यूयॉर्कच्या पॅरामाऊंट जेम्सचे संस्थापक पन्नालाल जैन यांनी केले.लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची जैन यांनी लोकमत भवनात पत्नी रजनी यांच्यासह भेट घेतली. त्यावेळी ते लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी बोलत होते. खा. दर्डा यांनी जैन दाम्पत्याला बुटीबोरीच्या लोकमत प्रिंटिंग प्रेस संकुलात उभारलेली ‘स्टॅच्यू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’ची प्रतिकृती भेट दिली. मोदींनी सप्टेंबरमध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतात येणाऱ्यांसाठी ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ची घोषणा केली. मात्र आजही प्रवाशांना आॅनलाईन अप्लिकेशन करून भारतीय दूतावासाकडून मंजुरी घ्यावी लागते व नंतरच विमानात चढता येते किंवा भारतात पोहोचल्यावर व्हिसा मिळतो. ही घोषणा फसवी असल्याचे जैन म्हणाले. मोदींनी अनिवासी भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याची घोषणा केली होती. पण, प्रत्यक्षात दुहेरी नागरिकत्व हे भारताने अमेरिकेशी करार केल्याशिवाय शक्य नाही आणि तशी कुठलीच हालचाल सरकारकडून होत नाही. एवढेच नव्हे तर ज्या अनिवासी भारतीयांजवळ अमेरिकेचा पासपोर्ट आहे, त्यांची नाळ भारतापासून तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही जैन म्हणाले.जागतिक हिरा व्यवसाय दहा अब्ज डॉलरचा मानला जातो. त्यात भारतीय व्यापाऱ्यांचे योगदान ६५ टक्के आहे. विशेषत: काठियावाडी, कच्छी व मारवाडी जैन समाजाच्या मंडळींचे जगभर वर्चस्व आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यूयॉर्कमधील जैन यांची पॅरामाऊंट जेम्स ही कंपनी अमेरिकेतील व्यापाऱ्यांना पैलू पाडलेल्या हिऱ्यांचा पुरवठा करते. सुट्या हिऱ्यांपेक्षा हिरेजडित आभूषणांना अमेरिकेत जास्त मागणी आहे आणि ती मध्यमवर्गीयांकडून आहे, असे रजनी जैन म्हणाल्या.सहा पिढ्यांपासून व्यवसाय- जैन कुटुंबीय सहा पिढ्यांपासून या व्यवसायात आहेत. जैन यांच्या वडिलांनी १९३० मध्ये हिरे निर्यात सुरू केली. ते पहिले निर्यातदार होते.
व्यापार सुलभीकरणाशिवाय आर्थिक प्रगती अशक्य
By admin | Published: December 29, 2015 2:00 AM