मुंबई : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला शुक्रवारी सुरूवात झाली. आघाडीत समविचारी पक्षांना सामावून घेण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, मनसे अथवा शिवसेनेला सोबत घेता येणार नाही. शिवाय, या पक्षांचा समावेशाबाबत कोणताही प्रस्तावच अद्याप आला नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.जागावाटपाबात दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, शरद रणपिसे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. दोन्ही पक्षांनी जिल्हानिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेतला. दुष्काळ, वीजेचा तुटवडा अशा राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीत ३१ आॅक्टोबरपूर्वी जागा वाटप पूर्ण करण्याची मागणी केली होती. याबाबत विचारता लवकरात लवकर चर्चा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. लवकरच ही प्रक्रीया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.ते फक्त पुस्तकाचे निमंत्रणउद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट ही फक्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील उपस्थितीसाठी होती. या भेटीत राजकारण शोधू नका, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. आघाडीत त्यांनी यावे, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि माणिकराव ठाकरे त्यांची भेट घेणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.अबू आझमी काँग्रेस नेत्यांच्या भेटीलासमाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज काँग्रेस नेत्यांची भेट घेत महाआघाडीबाबत चर्चा केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चे आधीच आझमी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.
शिवसेना-मनसेशिवाय होणार आघाडी; प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 1:44 AM