मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज 27 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही सत्तास्थापनेचा तिढा काही सुटताना दिसत नाही. भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत. तर शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी राजकीय घडामोडींना वेग आले आहे. मात्र काही ही झाले तर शिवसेनेशिवाय राज्यात सत्ताच स्थापन होऊ शकत नाही असा दावा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केला आहे.
दिवाकर रावते यांनी मंगळवारी औरंगाबादेत गंगापूर तालुक्यातील मदत केंद्रांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. महासेना आघाडी असू दे किंवा युती शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकत नाही. असे ते यावेळी म्हणाले.
तर पुढे बोलताना रावते म्हणाले की, राज्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असल्याचे ते म्हणाले.
तर पिक विम्या बद्दल बोलताना रावते म्हणाले की, विमा काढलेले आणि विमा न काढलेले अशा दोन याद्या आहेत. विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केली जाणार आहे. तसेच ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांच्यासाठी शासन दरबारी मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.