‘वंचित’शिवाय की ‘वंचित’सह? वंचित नसेल तर काय? आधी मागितल्या १५ जागांची, मग ५ वर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:50 AM2024-03-07T06:50:31+5:302024-03-07T06:52:57+5:30
जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे पुढे सरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जागांच्या फॉर्म्युल्यावर बुधवारच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यांच्याकडून आता नवा प्रस्ताव येणार असून, ९ मार्चला होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही.
वंचित नसेल तर काय?
वंचितची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्यास तिन्ही पक्षांनी जागावाटप निश्चित केल्याचे समजते. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक २३, काँग्रेस १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ९ जागा लढविणार आहे.
१५ ओबीसी उमेदवार द्या
वंचितने जागावाटप करताना १५ ओबीसी, तर ३ अल्पसंख्याक उमेदवार देण्याची भूमिका मांडली; मात्र, त्यावर चर्चा झाली नाही, अशी माहिती वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
‘पुढच्या बैठकीत ठरेल’ : सध्या मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला नंतर ब्रिफिंग होईल. मी अजून कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळे ठरेल, असे प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडल्यावर म्हणाले.
आधी १५ जागांची मागणी, मग ५ वर -
बैठकीला येण्याआधी वंचितकडून १५ जागांची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात बैठकीत रामटेक, दिंडोरी, सोलापूर, अमरावती आणि अकोला या पाच जागांची मागणी करण्यात आली. मात्र, आघाडी ३ जागा देण्यास तयार असल्याचे समजते. त्यातील २ जागा या शिवसेनेच्या कोट्यातून, तर उर्वरित जागा कोण सोडणार हे अद्यापही ठरलेले नाही.