श्रीकिशन काळे - पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी लांडग्याचा अधिवास असून, त्यांचा प्रजनन काळ आता सुरू होत आहे. मानवी वस्ती वाढत असल्याने त्यांचा अधिवास नष्ट होत असल्याने ते इतर भागात अधिक दिसून येत आहेत. लांडगा वाचवायचा असेल, तर त्यांचा अधिवास टिकविणे आवश्यक आहे. लांडगा हा माळरानावरील परिसंस्थेतील सर्वोच्च घटक समजला जातो. पण सध्या कात्रज घाट परिसर, सासवड, मोरगाव, बारामती, दिवे घाट परिसरातील त्याचा अधिवास हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे त्यांना राहण्यायोग्य जागाच शिल्लक नाही. पाण्याच्या स्त्रोतांशेजारी ते आपली गुजराण करीत आहेत. नदीकाठी वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांना ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी मिळत आहे. संरक्षित जमिनीपेक्षा इतर परिसरातच आता लांडगा आपले आयुष्य जगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाने त्यांच्यावर संकट येत आहे. ग्रासलॅँड संस्थेकडून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी शक्यतो लांडग्यांना त्रास न देता त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवे. लांडग्यांच्या अधिवासामध्ये मानवाची ये-जा वाढल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. भारतीय वन कायद्यानूसार लांडग्यांची प्रजाती संरक्षित करण्यात आली आहे. त्यांच्या शिकारीवर प्रतिबंध आहे. नागरिकांनी जर त्यांच्याशी जुळवून घेऊन अधिवासात अधिक हस्तक्षेप केला नाही, तर त्यांची प्रजाती वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ग्रासलॅँड संस्थेचे मिहिर गोडबोले यांनी दिली.
ते जोडीजोडीने अथवा टोळ्यांनी राहतात आणि शिकार करतात. उंदीर, घुशी, ससे, हरणे इत्यादींचा त्यांच्या भक्ष्यात समावेश होतो. क्वचित प्रसंगी ते मनुष्यवस्तीत शिरून गुरांवर व पाळीव जनावरांवर हल्ला करतात, तर कधीकधी ते लहान मुलेही पळवितात.लांडग्यामध्ये नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. त्यांच्या प्रजननाचा काळ पावसाळा संपत असताना सुरू होतो. गर्भावधी ६०-६३ दिवसांचा असून पिले डिसेंबरमध्ये जन्मतात. नैसर्गिक अधिवासात लांडगा १२-१५ वर्षे जगतो.१९७२ सालच्या वन्य जीवांचे रक्षण या कायद्यानुसार भारतात लांडग्यांना संरक्षण देण्यात आले असून त्यांच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे.