ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २१ : पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर महिलेने प्रियकराला बोलावून घेऊन त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास घडली. शनिवारी सकाळी घरमालकाने बेशुद्धावस्थेत पडलेल्या मयताची माहिती पोलिसांना दिल्यावर तपासाची सुत्र हलली. शवविच्छेदनाच्या अहवालामधून हा खून असल्याचे रात्री उशीरा निष्पन्न झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
वैभव बंडू राऊत (वय 21, रा. जैन मंदिर, साईनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्चना गणेश मनसावाले (वय 23, रा. शेलार वाडा, कात्रज गाव) हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार रविंद्र देवरुखकर (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना हिचे लग्न झालेले असून तिचे पती गणेश मोटारीवर चालक आहेत. त्यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. तर खून झालेल्या वैभवचेही सहा महिन्यांपुर्वी लग्न झालेले आहे. तो पॅगो रिक्षा चालवत होता.
त्याचे आणि अर्चनाचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध येत होते. अनेकदा अर्चनाचे पती गणेश यांना प्रवाशांना घेऊन बाहेरगावी जावे लागत होते. अर्चना आणि वैभवच्या अनैतिक संबंधांची वैभवच्या कुटुंबियांना कल्पना होती. त्यांनी एकमेकांचे संबंध तोडावेत यासाठी तीन चार वेळा बैठकाही झालेल्या होत्या. मात्र, दोघेही कोणाचेही ऐकत नव्हते.
गणेश यांना प्रवाशांना घेऊन बाहेर गावी जायचे होते. ते दोन दिवस बाहेरगावीच राहणार असल्यामुळे अर्चनाने वैभवला शनिवारी रात्री घरी बोलावून घेतले. दारु पिऊन तिच्या घरी आलेल्या वैभवसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. वैभवने तिला नव-याला व मुलीला सोडून स्वत:सोबत चलण्याची गळ घातली. मात्र, अर्चनाने त्याला नकार देताच त्याने पट्ट्याने तिला मारहाण केली. चिडलेल्या अर्चनाने त्याचा हाताने गळा दाबून खून केला. सकाळी वैभवला तिने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मदत मागण्यासाठी ती जवळच रहात असलेल्या चुलत बहिणीकडे गेली. चुलत बहिणीने तिला वैभवला रुग्णालयात नेण्यास सांगितले.
दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास तिचे घरमालक नितीन शेलार यांनी पोलिसांना फोन करून घरामध्ये एकजण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वैभवचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. दरम्यान, अर्चना कात्रज चौकीमध्ये गेली. तिच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली.
मृतदेहाच्या गळ्यावर ब्रण होते तसेच कानाच्या खाली खरचटलेले होते. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू गळा दाबल्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केल्यावर त्याचा गळा दाखून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली.अर्चनाचा पती गणेश आणि वैभव यांची ओळख कामामधून झालेली होती. एकमेकांकडे जाण्यायेण्यामधून अर्चना आणि वैभवमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अर्चना आणि तिचा पती सोलापूरचे असून वैभव उस्मानाबादचा रहीवासी होता. त्याचे वडील बंडू रावसाहेब राऊत यांच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आला आहे. त्याच्यावर उस्मानाबादमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.