सोमनाथ खताळ
बीड : बीडमधील मृतदेह अवहेलना प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कोरोनाबाधित असल्याने मृतदेह परत आणून नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करीत नातेवाईकांवर गुन्हा दाखल करणारा आरोग्य विभाग अडचणीत सापडला आहे. ज्या महिलेचा मृतदेह परत बोलावला, ती महिला कोरोनाबाधित असल्याचा कसलाच पुरावा आरोग्य विभागाकडे नाही. विशेष म्हणजे त्या महिलेची आयसीएमआर पोर्टललाही नोंद नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.
लता सुरवसे (३२, रा. कुंभारवाडी, ता. गेवराई) या महिलेला कोरोनाबाधित म्हणून २३ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. १७ मे रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारांसाठी गावी गेले. परंतु, प्रशासनाने त्यांना परत बोलावून घेतले. बीडमध्ये नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले; तर जिल्हा रुग्णालयातील नर्सने नातेवाईकांनी वैद्यकीय तपासणी न करता आणि परवानगी न घेता मृतदेह पळविल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली.
ज्या महिलेचा मृतदेह परत आणला, तिची कोरोनाबाधित म्हणून कोठेच नोंद नसल्याचे समोर आले आहे. वॉर्डमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मात्र कसलाही पुरावा न पाहता २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार केले आहेत. केवळ केसपेपरवर कोणीतरी पॉझिटिव्ह असे लिहिलेले आहे.
डॉक्टर म्हणतात, नातेवाइकांचा दबावया प्रकरणात येथील डॉ. गिरीश गुट्टे यांचा जबाब घेण्यात आला असून, नातेवाईकांनी दबाव टाकल्यानेच आपण अँटिजन टेस्ट केेल्याचे त्यांनी सांगितले. वॉर्डबॉय, परिचारिका, तंत्रज्ञ या सर्वांचे जबाब घेतले असून, मृत्यूनंतरची चाचणी निगेटिव्ह असल्याचे त्यांचे मत आहे.
या प्रकरणातील चौकशी अहवाल आला होता. परंतु, नातेवाईकांचे जबाब नसल्याने तो परत पाठविला आहे. यात सर्व बाजू समजावून घेतल्या जातील. महिलेची नोंद आयसीएमआर पोर्टलला आहे की नाही, याची तपासणी करण्यासही सांगितले आहे. - डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड