कोल्हापूर – २१ व्या शतकात भारत देश विकसित देशांसोबत स्पर्धा करत आहे तर दुसरीकडे आजही भारतात असा भाग आहे ज्याठिकाणी मुलभूत सुविधांचाही अभाव पाहायला मिळतो. याठिकाणी रस्ते, वीज पोहचणंही दुर्गम आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातील वासनोली येथे धनगरवाड्यात रस्ते नसल्यानं एका गर्भवती महिलेला डोलीवरून डिलीव्हरीसाठी घेऊन जावं लागत होतं.
धनगरवाड्यापर्यंत रस्त्याची सुविधा नाही. म्हणून या गर्भवती महिलेला डोलीवरून आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यात येत होते मात्र वाटेतच या महिलेने मुलीला जन्म दिला. महिला आणि नवजात बालिकेला गारगोटीच्या ग्रामीण हॉस्पिटलला पोहचवण्यात आले. या दोघींचीही तब्येत सुखरूप आहे. भूदरगड तहसिल परिसरात येणाऱ्या धनगरवाडा येथे जवळपास २०० जणांची वस्ती आहे. मात्र या वस्तीपर्यंत जाण्यासाठी ३ किमी चालत जावं लागतं. सतत पडणाऱ्या पावसामुळे या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यात चिखल साचला आहे.
शुक्रवारी वस्तीत राहणाऱ्या २३ वर्षीय संगीता फटकारे यांना प्रसुती वेदना झाल्यानंतर घरच्यांनी आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना संपर्क साधला. राधानगरी जंगलाला लागून असलेल्या या रस्त्याने एकटं जाणं खूप धोकादायक आहे. आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्या मुसळधार पावसातही याच रस्त्याने धनगरवाड्यात पोहचल्या. संगीताची डिलीव्हरी तारीख २ जुलै सांगण्यात आली होती. पण १५ दिवस आधीच संगीताच्या पोटात दुखू लागले.
धनगरवाड्यापर्यंत जाण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. त्यामुळे याठिकाणी रुग्णवाहिका पोहचणं दूरच राहिलं. येथील काही गावकऱ्यांनी संगीताला डोलीत बसवून पक्क्या रस्त्यापर्यंत नेत होते. तेव्हा वाटेतच संगीताला वेदना असहाय्य झाल्या. संगीताची अवस्था पाहून आशासेविकांनी वाटेतच डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला. महिलेने घरातून डोलीत बसवून नेत असतानाच तिची डिलीव्हरी झाली. तिने लहान चिमुकलीला जन्म दिला असं आरोग्य अधिकारी डॉ. सचिन यत्नालकर यांनी सांगितले.
या घटनेने आपल्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतील. जर एका महिलेला रस्त्यासारखी मुलभूत सुविधा नसल्याने अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागला असेल तर या क्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यायला हवं. मतं मागताना विकासाचे खूप मोठमोठे आश्वासन दिली जातात परंतु निकाल लागल्यानंतर कोणी फिरकतही नाही असं स्थानिक लोक म्हणतात. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक आरोग्याचा अभाव असलेल्या या क्षेत्रात दोन वेळचं कमवण्यासाठीही लोकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागतो.