मुंबई: चाळीस वर्षीय महिलेने १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर तीन महिने लंैगिक अत्याचार करण्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मुलाच्या पालकांनी पोलिसांत लेखी तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने ही बाब ‘लोकमत’ने बुधवारी, प्रसिद्ध केली. त्यानुसार पोलिसांनी आज तत्काळ या महिलेवर पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पॉस्को कलमांतर्गत एखाद्या महिलेवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.दहावी इयत्तेत शिकणारा हा अल्पवयीन मुलगा आई-वडिलांसोबत चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहतो. याच परिसरात आरोपी महिला देखील राहते. वर्षभरापूर्वी या आरोपी महिलेच्या मुलासोबत पीडित मुलाची ओळख झाली होती. डिसेंबर महिन्यात या महिलेने पीडित मुलाला थंडपेयातून गुंगीचे औषध देत या मुलावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे मुलाने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली. शनिवारी त्याच्या वडिलांनी त्याला आरसीएफ पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी मुलाची हकिकत ऐकून घेतल्यानंतर त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. मात्र तीन दिवसानंतर देखील काहीच कारवाई झालेली नाही. अखेर ‘लोकमत’ने या मुलाची आणि त्याच्या कुटुंबियांची व्यथा बुधवारच्या अंकात मांडली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ हालचाल करत आज सायंकाळी या आरोपी महिलेविरोधात गुन्हा बाललैंगिक अत्याचार ४,८,१२आणि ३४१,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ महिलेवर अखेर गुन्हा दाखल
By admin | Published: April 02, 2015 4:54 AM