मुंबई : दिल्लीत पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ पत्रकार महिलेला सामुदायिक बलात्काराची धमकी टिष्ट्वटरवरून देण्यात आली आहे. अमरेंद्र कुमार सिंग नावाच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून त्यांना धमकावण्यात आले आहे. भारतमातेविरुद्ध गद्दारी करणाऱ्यावर दोन दिवसांत सामूहिक बलात्कार केला जाईल, असे टिष्ट्वट केले आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटरवर तक्रार दिल्यानंतर संबंधितावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांवर देशद्रोही वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत असताना ‘अभाविप’चे कार्यकर्ते व वकिलांनी त्यावेळी वार्तांकनासाठी हजर असलेल्या पत्रकारांना मारहाण केली. त्याविरुद्ध देशभरात निषेध व्यक्त होत आहे. बुधवारी मुंबई प्रेस क्लबतर्फे हल्ल्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. त्यात या ज्येष्ठ महिला पत्रकार सामील झाल्या होत्या. निषेध मोर्चाची छायचित्रे त्यांनी फेसबुक आणि टिष्ट्वटरवर अपलोड केली होती. त्यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास अमरेंद्र कुमार सिंग नावाच्या व्यक्तीने त्यांना टिष्ट्वट करून सामूहिक बलात्काराची धमकी दिली. संबंधित महिला पत्रकाराने मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली. रात्री उशिरा आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
महिला पत्रकाराला टिष्ट्वटरवरून धमकी
By admin | Published: February 18, 2016 6:55 AM