भातसानगर : शहापूर तालुक्यात शेतीबरोबरच इतर उत्पादनात होणारे महत्त्वपूर्ण बदल, यामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा, बचत गटांनी केलेली कामगिरी याचा अभ्यास करण्यासाठी नंदुरबार येथील महिलांनी कांबरे, कानविंदे या गावांना भेटी देऊन पाहणी केली. तालुक्यात असा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून आलेला हा पहिलाच दौरा असल्याने महत्त्व प्राप्त होत आहे.झपाट्याने वाढत असलेल्या कृषीबदलाचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी तालुका कृषी अधिकारी अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याबरोबरच कांबरे येथील १४ बचत गटांतील महिला मार्गदर्शक रंजना थोरात यांच्यासह भरारी ग्रामसंस्थेच्या कविता विशे, मानसी विशे, कांचन विशे, शोभा विशे, माया विशे, संगीता पवार, सुनंदा विशे, मीरा विशे यासह अनेक महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावात शिवणकाम प्रशिक्षण, ब्युटी पार्लर कोर्स, जपानी पद्धतीने (एसआयआर) केलेली भातशेती, कापणी यंत्राने केली जाणारी भातकापणी, झोडणी, बचत गटांचे चाललेले काम याचा दोन दिवस अभ्यास केला. आज या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली असून महिलांना आता प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विशे, माधव भेरे यांनी सांगितले. भातलागवडीबरोबरच भाजीपाला व अनेक प्रकारची कडधान्येही मोठ्या प्रमाणात या बचत गटातील महिला घेत आहेत. बारमाही असणाऱ्या पाण्याचा योग्य उपयोग करून दुबार भातशेतीही केली जाते. महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय नंदुरबार यांनी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता. यामध्ये संगीता भाले, मंगला लुळे, महाव्यवस्थापक मिलिंद पाटील यांच्यासह अनेक महिला या अभ्यास दौऱ्यावर आल्या होत्या. आमच्याकडे भातशेती कमी प्रमाणात होत असली तरी कमी जागेत अधिक उत्पादन व इतर प्रकाची उत्पादने पाहिल्याने याचा आम्हाला खूप उपयोग होणार असल्याचे महिलांनी सांगितले. (वार्ताहर)
नंदुरबारच्या महिला शहापुरात
By admin | Published: October 25, 2016 2:31 AM