सातारा - एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलेले असताना काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने नंतर या मोर्चात सहभागी असलेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. दरम्यान, या मोर्चात अटकेची कारवाई झालेल्या कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर यांचं निधन झालं आहं. सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर सुषमा नारकर यांना अटक झाली होती. त्यानंतर त्या आठ दिवस तुरुंगात होत्या. दरम्यान, जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या. त्यातच प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांचं निधन झालं.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याच्या मान सुषमा नारकर यांनी मिळवला होता. सुषमा नारकर ह्या २००० मध्ये कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे २२ वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती.
दरम्यान, गतवर्षी एसटीच्या विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये सुषमा नारकर यांनीही सहभाग घेतला होता. हे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत असताना काही एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेला होता. त्या मोर्चातही त्या सहभागी होत्या. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर अनेक एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये सुषमा नारकर यांचाही समावेश होता. त्यानंतर आठ दिवस त्या तुरुंगात होत्या. पुढे त्यांची जामिनावर मुक्तता झाली. पुढच्या काळात त्या आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचं निधन झालं.