ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-लोणावळा लोहमार्गावर देहूरोडच्या बापदेवनगर येथे आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
निकीता संजय आगरवाल (वय १८, रा. देहूरोड) असे या अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर यात तिची मैत्रिण हर्षदा शंकर तलारी (वय १९, रा. देहूरोड) आणि निकीताच्या बचावासाठी आलेला धनराज तोडकर (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्षदा व निकीता या पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून १२ वाजून २० मिनिटांनी सुटणाऱ्या पुणे-लोणावळा लोकलमध्ये पिंपरी रेल्वे स्थानक येथून निकीता व हर्षदा गाडीमध्ये चढल्या. निकीता व हर्षदा पाय सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून पुणे-लोणावळा लोहमार्गावर दुरुस्तीचे काम सुरु आहे. काम झाल्यानंतरही कामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी अँगल रेल्वे ट्रॅकलगत मातीत उभे रोवून ठेवण्यात आले होते.
बापदेवनगर येथून लोकल जात असताना निकिताची चप्पल या लोखंडी अंगलमध्ये अडकली. ती काढण्याचा प्रयत्न करत असतानाच हर्षदाने तिला पकडून ठेवले. मात्र, निकीता लोकलमधून बाहेर फेकली गेले. तिच्याबरोबर हर्षदाही फेकली जात असतानाच धनराज याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही बाहेर फेकला गेला. यामध्ये निकीता जागीच ठार झाली तर हर्षदा व धनराज जखमी झाले आहेत. बापदेवनगरमधील रहिवाश्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले.