मुंबई : भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका २४वर्षीय तरुणीला धडक दिल्याची घटना रविवारी शिवडी परिसरात घडली. या अपघातात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वडाळा पोलिसांनी दिली. शिवडी पूर्व स्थानकाच्या फाटकालगत असलेल्या वडाळा बीपीटी रोडवर रविवारी सकाळी साडे-सहाच्या सुमारास हा अपघात घडला. शिवडी कोळीवाडा परिसरात राहत असलेली किंजल पाटील (२४) ही सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी जात होती. तेव्हा भरधाव वेगात आलेल्या डम्परने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली. येथील काही रहिवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ या तरुणीला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टँकरचालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र रहिवाशांनी त्याला चोप देत वडाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे करण्यात यावेत, तसेच अपघातांच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणीदेखील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
कंटेनरच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी
By admin | Published: May 16, 2016 4:32 AM