वाकड : मंदिरात जाऊन देवाची पूजा करायची आहे. तुमचा आशीर्वाद द्या, असे सांगत महिलेचे दागिने लुटल्याची घटना वाकड येथील डांगे चौकात शुक्रवारी (दि. २४) सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ज्योती जयकुमार कोठडिया (वय ६०, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भामट्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डांगे चौकात किराणा दुकान आहे. फिर्यादी या दुकानात असताना सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घातलेला एक तरुण दुकानात आला. त्याने ५० रुपये किमतीचा अगरबत्तीचा बॉक्स घेतला आणि त्या महिलेला शंभर रुपये दिले. फिर्यादी महिलेने दहाच्या पाच नोटा असे ५० रुपये परत केले. या वेळी त्याने मला मंदिरात जाऊन देवाची पूजा करायची आहे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, असे सांगून एक दहाची नोट महिलेच्या हातावर ठेवली. त्यानंतर ती नोट चार वेळा महिलेच्या हातावरून फिरवली. त्या वेळी महिलेला काहीसे अस्पष्ट दिसू लागले आणि काही वेळातच त्या भामट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व हातामधील अंगठी काढून फसार झाला. काही वेळाने महिलेला हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन प्रकार सांगितला. (वार्ताहर)देहूरोड : शितळानगर (मामुर्डी) येथील स्मशानभूमीसमोरील मैदानावर एका मजूर तरुणाचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास आढळून आला. दिलीप एकनाथ सोनवणे ( वय ३७ , रा. दत हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुनील शंकर गायकवाड ( वय ४०, रा. मामुर्डी, देहूरोड ) यांनी खबर नोंदविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितळानगर येथील स्मशानभूमी समोरील जॉली स्पोर्ट मैदानावर शुक्रवारी सकाळी तरुणाचा खून केलेला मृतदेह असल्याची खबर फिर्यादी सुनील याने पोलिसांना दिली. पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी, सतीश शिंदे, सहायक फौजदार श्यामराव परदेशी, बाळासाहेब अहिवळे, पोलीस हवालदार विनोद शिंदे , पोलीस नाईक वसीम शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली. मारेकऱ्यांनी डोक्यात, चेहऱ्यावर दगडाने ठेचूने खून केलेला अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. मागील भांडणाच्या कारणावरून वाकड येथे एका टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील आरोपी अनिकेत पवार व मिलन वडक या दोघांची दुबई चाळीत राहणाऱ्या इनामदार यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते.या भांडणाच्या कारणावरून अनिकेत पवार हा आपल्या साथीदारांसह दुबई चाळ येथे आला आणि तेथील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. फरार झालेल्या धनंजय उद्धव सुर्वे (वय २८), संदीप सुधाकर गायकवाड (वय २४), अनिकेत अनिल पवार (वय २०, रा. सर्व थेरगाव), अप्पा राजू नखाते (वय २०, रा. रहाटणी), सुमीत गंगाराम इंगवले (वय २६, रा. थेरगाव), उमेश खेंगरे (वय २३, रा. थेरगाव), मिलन संजय वडक (वय २३) व शुभम अरुण रुपटक्के (वय २०, रा. पडवळनगर, थेरगाव) या आरोपींना अटक केली आहे.
आशीर्वादाच्या बहाण्याने लुटले महिलेला
By admin | Published: June 25, 2016 12:30 AM