मनीषा म्हात्रे, मुंबईनोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील विवाहितेला देहविक्रीसाठी दुबईत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चार दिवस दुबई एअरपोर्टवरील एका शौचालयात डांबून ठेवलेल्या या विवाहितेची अखेर सुटका झाली आहे. अशा प्रकारे महिलांना सापळ््यात अडकविणाऱ्या या टोळीतील पसार असलेल्या मास्टरमाइंडने अशाप्रकारे ५०० पेक्षा अधिक महिलांची सौदीमध्ये विक्री केली असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.कुलाबा परिसरात वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय रशीदाचा (नाव बदललेले आहे) पती अंथरुणाला खिळला आहे. त्याच परिसरातील एका उद्यानात ती सुरक्षारक्षक म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी तिची देहविक्रीसाठी मुलींचा सौदा करणाऱ्या टोळीतील गुलाबजान उर्फ मुन्नीसोबत गाठ पडली. रशीदा देखणी असल्याने या महिलेने रशीदासोबत ओळख वाढवून तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. रशीदाच्या घरच्या परिस्थितीबाबत माहिती घेऊन मुन्नीने तिला दुबईमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कुटुंबाच्या सुखासाठी तिने दुबईला जाण्यास होकार दिला.त्यानुसार, दुबई एअरपोर्टवर आफताब आलम खान आणि अब्दुल रफिकसोबत ओळख करून रशीदाचा सौदा करण्यात आला. याची माहिती मिळताच रशीदाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर या दोघांच्या ताब्यात रशीदाला सोपवून मुन्नी निघून गेली. दुबई येथून रशीदाला देहविक्रीसाठी सौदीत न्यायचे होते. तिचा व्हिसा तयार होण्यास अडचणी आल्याने तब्बल चार दिवस एअरपोर्टवरील शौचालयात तिला डांबून ठेवण्यात आले होते. पळण्याचा प्रयत्न केल्यास मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. शौचालयातील पाणी पिऊन ती जगली. तिची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तिला बाहेर आणले. या संधीचा फायदा घेत, रशीदाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने आरोपींना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुबई पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, महिलांची विक्री करणाऱ्या सराईत टोळीतील आरोपी असल्याचे समोर आले. त्यानुसार या दुकलीबरोबरच त्यांनी मुन्नीलाही अटक केली. त्यानंतर रशीदाला सुखरूप मुंबईत आणण्यात आले. कुटुंबीयांकडे परतल्यानंतर रशीदाने रविवारी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
देहविक्रीसाठी दुबईत नेलेल्या महिलेची सुटका
By admin | Published: November 25, 2015 3:07 AM