वाशिम : कोकिळा व्रताची पूजा करून नदीवर स्नानासाठी गेलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, बुडत असलेल्या इतर चार महिलांना वाचविण्यात यश आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गिव्हा कुटे येथे घडली. वाशिम तालुक्यातील गिव्हा येथे जलयुक्त शिवार अंतर्गत चंद्रभागा नदीमध्ये पाणी अडवण्यात आलेले आहे. सध्या कोकिळा व्रत सुरू असल्याने गावातील व परिसरातील शेकडो महिला रोज पूजा करून या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी जातात. गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालताबाई भुसारे या स्नानासाठी नदीवर गेल्या.यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. ही बाब शेजारी स्नान करणार्या इतर महिलांच्या लक्षात आली आणि त्या मदतीसाठी धावल्या. नदीपात्रात पाणी जास्त असल्याने मदतीसाठी गेलेल्या महिलाही बुडू लागल्या. दरम्यान, नदी काठावर असलेल्या इतर महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी बाजूच्या शेतात काम करत असलेले लोक मदतीसाठी धावले. यावेळी काही महिलांनी धाडस दाखवून बुडत असलेल्या लक्ष्मीबाई भुसारी (३८), कमलाबाई भुसारी (४0), रेखा भुसारी (४५) आणि गंगाबाई भुसारी (४५) यांना कसेबसे बाहेर काढले. मालताबाई भुसारी (वय ४५) यांचा मात्र बुडून मृत्यू झाला. दरम्यान, चारही महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून ठाणेदार विनायक जाधव पुढील तपास करीत आहेत.
स्नानासाठी नदीवर गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू
By admin | Published: August 28, 2015 12:31 AM