शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्त्री शक्तीचा 'पेन'फुल जागर...!

By admin | Published: March 08, 2017 7:27 AM

साहित्य संमेलन केवळ अक्षर आविष्कारापुरतेच मर्यादित नसून, ते स्त्री शक्तीचा जागर करणारे असल्याने त्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 - डॉ. विजया वाड

आज जैन समाजातर्फे स्त्री साहित्य संमेलन सुरेखा कटारिया ही एक तडफदार स्त्री भरवीत आहे आणि उभ्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत विविध ठिकाणांहून येथे महिला आल्या आहेत. याचा मला विशेष आनंद होत आहे. आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. 
हे साहित्य संमेलन केवळ अक्षर आविष्कारापुरतेच मर्यादित नसून, ते स्त्री शक्तीचा जागर करणारे असल्याने त्यास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मी नम्रपणे सांगू इच्छिते की, हे संमेलन एकदिवसीय असल्याने साहित्याचा बृहद् आराखडा मांडण्यापेक्षा मी मनमोकळे हितगूजच पसंत करेन. कारण मला दिलेली वेळ केवळ २० मिनिटे आहे आणि एकदिवसीय संमेलनात ती उचितही आहे. 
‘सहित’लिहिलं जात ते साहित्य यावर माझा ठाम विश्वास आहे. जे साहित्य वाचून वाचकास आनंद, आत्मविश्वास आणि जगण्यासाठी आशा मिळते अशा साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक सदैव असतात. विशेषत: स्त्रिया व मुली यांना अशा लिखाणाची फार गरज असते. म्हणून तर गेली ४६ वर्षे मी याच अंगाने माझी लेखणी सदैव चालविली आहे. युवतींचा आत्मविश्वास वाढावा, स्त्रीचे आत्मभान जागृत व्हावे म्हणून लिहित राहिले आहे. 
मैत्रिणींनो, स्त्रीच्या साहित्याकडे उपहासाने, उपक्षेने पाहण्याचे दिवस केव्हाच मागे पडले किंबहुना लेखनात तिला सहानुभूतीची गरजच उरलेली नाही. ती धीट आणि आश्वस्त झाली आहे. प्रसंगी आक्रमकही. अगदी ‘तिसरी घंटा’ जरी वाजली आयुष्यात, तरी खडे बोल सुनावण्याची ताकद स्त्रीच्या लेखनात आली आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. 
खरे तर आत्मचरित्रांनी स्त्रीचे अंतरंग शक्तिशाली स्वरूपात वाचकांसमोर आले. अगदी ‘स्मृतिचित्रे’ या लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मवृत्तापासून थेट यशोदा पाडगावकरांच्या ‘कुणास्तव कुणीतरी’पर्यंत वाचत आलात, मधे आनंदीबाई विजापुरेंचे ‘अजुनि चालतेची वाट’ विचारात घेतले, तर स्त्रीच्या सोसण्याचा, धीटपणाचा, व्यक्त होण्यासाठी धडपडण्याचा आणि तिच्या मनोसामर्थ्याचा आलेख तुमच्या नजरेसमोर उभा राहील. ८-८-१९८८ या दिवशी माधवी सरदेसाई यांचे ‘नाचं गं घुमा’ आणि माझं ‘अवेळ’ (कथासंग्रह) शांताबाई शेळके यांच्या हस्ते पुण्यात चंद्रकला प्रकाशनाने प्रकाशित केले. 
‘नाचं गं घुमा’च्या सर्व प्रती एकगठ्ठा एका माणसाने खरेदी करून कुलूपबंद केल्या, पण प्रकाशिकेने आठच दिवसांत नवी आवृत्ती काढली. किती दाबाल तोंड? मला त्या पुस्तकावरची बिनचेहऱ्याची बाई आठवते. फक्त कुंकू असलेली. 
‘बाई, तुझ्या कुंकवाला , सौभाग्याचा गं आधार
‘त्या’च्याविन व्यर्थ आहे, जीवनाचा हा व्यापार’... असं सांगणारी ते खरंच का हो? मला सांगा! अगदी साधं उदाहरण बघा. नित्याच्या व्यवहारातलं ‘ति’ नि ‘तो’ एकदम जाऊ शकत नाहीत देहरूपातून स्वर्गात. पण ‘ती’ अवेळी गेली तर तो लग्न करतो नि वृद्धापकाळी गेली तर बिच्चारा होतो. ती दोहोवेळी फाईट मारते. कणखरपणे उभी राहते. स्त्री अधिक टणक, कणखर नि सोशिक असल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. तिला आयुष्याची लढाई दमदारपणे लढता येते. 
मी वीस लेखक-लेखिकांना घेऊन ‘सावित्रीच्या लेकी’ हे पुस्तक संपादित केलं. त्यात १०० स्त्रिया आहेत. झगडून यशाप्रत पोहोचलेल्या. त्यातली एक मुलगी बुटकी होती आख्ख्या वर्गात. आईपाशी रडत गेली. ‘मीच का गं बुटकी?’ आई तत्काळ म्हणाली, ‘उंची शरीराची नाही बरं, डोक्याची मोजतात.’ झाली ना न्यूनगंडाची छुट्टी! मग तिनं मागे वळून बघितलंच नाही. पुढे ती सायन हॉस्पिटलची डीन झाली नि मग मुंबई विद्यापीठाची कुलगुरू. माझ्या सख्यांनो, त्या स्नेहलता देशमुख. एक पोर सावळी! बहीण मात्र गोरीगोरी पान, फुलासारखी छान. तिला वाईट वाटू लागले. वडिलांनी मुलीस जवळ घेतले. म्हणाले, ‘ती रूपसुंदर आहे, तू गुणसुंदर हो!’ किती आश्वासक शब्द. ती मुलगी आय.ए.एस. झाली. सचिवालयातील तिची कारकिर्द गाजली. पुढे ती महाराष्ट्राची मुख्य निवडणूक आयुक्त झाली. माझ्या मैत्रिणींनो, त्या नीला सत्यनारायण. या पुस्तकातल्या १०० स्त्रिया, १०० तेजोमय समया आहेत. ट्युबलाईट अधिक लखलखत असेलही, पण एका ट्युबने दुसरी ट्युब पेटत नाही, पण एक समई कित्येक ज्योती उजळू शकते. खरं ना? जरुर वाचा गं सयांनो. प्रस्फूर्त व्हाल. काही करण्याची नवी जिद्द, नवे चैतन्य, नवा उत्साह अंगी बाणवाल. 
साहित्यातील कथा, कविता, निबंध, स्फुटलेखन, कादंबरी, दीर्घिका, नाटक, चित्रपटाची पटकथा या कोणत्याही क्षेत्रात स्त्रीला दुय्यम लेखताच येत नाही. तिची कामगिरी प्रवाही, आशादायी आणि पुरोगामी राहिली आहे.
स्त्री लिहिती व्हावी या आग्रहापोटी मुंबईतल्या दोन साहित्यिका कथा क्लब चालवितात. एक विषय सुचवितात नि त्यावर भगिनी कथा लिहितात. या क्लबला पुुरुष मित्रांचे वावडे नाही बरं! तर डॉ. चारुशीला ओक आणि माधवी कुंटे या दोन नावाजलेल्या लेखिका ह्या क्लबला मार्गदर्शन करतात. तुम्हाला सांगते, अहो, कितीतरी बायका सर्जनशील लेखन करू लागल्या आहेत. त्यांच्या कथाचं पुस्तक निघालंय ‘जिची तिची कथा.’
मी स्त्रियांच्या हस्तलिखित मासिकांची अनंत उद्घाटने केली आहेत. हा सर्जनशील लिखाणाचा एक उत्तम आविष्कार आहे, असं मला आग्रहपूर्वक सांगावंसं वाटतं. प्रत्येकीजवळ एक कहाणी आहे. सांगण्यासारखे काही आहे. एक हस्तलिखित होतं- ‘पहिली रात्र’... नावच झळाळीचं! मी उत्सुकतेनं त्यातले लेख वाचले. पार्वतीबाई सदानंद काळे या ८५ वर्षांच्या बार्इंनी त्यांची ६५ वर्षांपूर्वीची पहिली रात्र अक्षरांकित केली होती. त्यांच्या आईनं सांगितलं होतं, ‘‘यजमान जे काही करतील ते करू द्यायचं. नाही म्हणायचं नाही कशाला. मग आपोआप सवय होते. रूळतं माणूस’’ त्या अतिशय घाबरल्या. यजमान खोलीत आहे नि त्यांनी धाडकन् दिवा बंद केला. पार्वतीच्या हातातला पाण्याचा तांब्या हात कापू लागल्याने खाली पडला. खोलीभर पाणी! नि पार्वतीचे रडणे. दिवा लावू न देणे. शेवटी यजमानांनी धोतराने फरशी पुसली. ‘रडणं आवर बाई. मी तुझ्या अंगास हातही लावणार नाही’. हा सूर. शेवटी ही रडून दमली नि यजमान फरशी पुसून. बार्इंनी शेवट मर्मज्ञ केला होता. पहाटे कधी तरी जाग आली. बाहेर मोगरा फुलत होता. त्याचा सुगंध आतपर्यंत पोहोचला होता आणि आत हे म्हणत होते... तुझं कुंकू मजहातून विस्कटलं बघ. ये, सारखं करतो!
सख्यांनो, पार्वतीबार्इंनी यापूर्वी कधीही साधं पत्रंही लिहिलं नव्हतं, पण या ‘रात्री’स त्या प्रथम पारितोषिक पटकावून गेल्या. आता खूपजणींना धीर आला ना? आपण लिहू शकू म्हणून!
नव्या नव्या लेखिका नवे नवे उन्मेष सादर करताना पाहून माझे मन आनंदचिंब होते. आपले संमेलन आयोजित करणारी सुरेखा पहा! तिने किती धडाडीने स्वत:ची साहित्य संस्था चालू केलीय. नाव आहे स्वानंद! छान नाव आहे ना? ती थोडी उशिरा लिहिती झाली... पण ‘लिहिती’ झाली या गोष्टीला माझ्या लेखी महत्त्व आहे. आज सहा पुस्तके आहेत तिची! तिने सादर केलेले कवितांचे प्रकटीकरण प्रेक्षक श्रोत्यांनी वेळोवेळी डोक्यावर घेतले. मी अत्यंत आनंदित आहे. तेव्हा ‘आता काय? सगळ्या गेल्या पुढे. मी कशी लिहू?’ असं वाटून मागे राहू नका. मनातली खदखद कागदावर उतरवा. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, खूपदा बोलताना संकोच वाटतो, पण कागद, पेन आणि मन यांचा त्रिवेणी संगम संकोचाचे पडदे दूर करतो. मन जिवा-शिवाशी तादात्म्य पावते... नाहीतर इतकं खरं बोलणारी आत्मचरित्रे स्त्रिया लिहू शकल्या असत्या का? थोडा विचार करा! तुमची दु:ख, तुमचे अपमान हे बोलून दाखविताना जड जाते. तुमची सुखं, तुमचं सामर्थ्य, तुमचं कर्तृत्व याबद्दल बोलताना, ‘ही आत्मप्रौढी तर नाही ना वाटणार?’ असं वाटून तुम्ही संकोचाल... पण शब्दसौख्य पराकोटीचे आनंददायी आहे गं सख्यांनो. आपलं आयुष्य हे एक उघडं पुस्तक असूदे. न जाणो, त्यातून पुढचीस ठेच, मागची शहाणी ठरेल.
आपल्या मुली हे आपलं महद्भाग्य आहे, असं आपल्याला वाटतं की नाही? अगं, मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे. इंग्रजीत तर एक म्हण प्रचलित आहे. ‘सन इज फॉर वाईफ अँड डॉटर इज फॉर लाईफ’ जरा आत्मपरीक्षण आणि निरीक्षण केलेत तर ती किती खरी रचना आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हण नाही ती! एक वादातीत सत्य आहे. जरा खुट्ट झालं तरी जिवाची पर्वा न करता माझ्या तुमच्या पोरी आपल्याकडे मायेने धावत येतात ना? तुम्हास विठो-रखुमाईच्या स्थानी श्रद्धेने बसविणाऱ्या पोरीचं हो आपल्या. त्यास शिकवा, चांगले साहित्य विकत आणून वाचायला द्या. समृद्ध करा. आपली मुलगी ही आपले वैभव आहे. मग तिला जपणे आपलेच कर्तव्य ना? ती जाडी असो, काळी असो, बुटकी... नकटी असो... तीस सांगा, ‘‘तू मला उभ्या जगात प्यारी आहेस.’’
बघा, ती कशी फुलारेल ते!
आपली मुलगी हे आपलं जीवन संपन्न करणारे जिवंत कथानक, रसभरले ‘साहित्य’ आहे. याचा विसर न व्हावा. हे साहित्य जितके सकस, निर्भय, आत्मबल वाढविणारे ठरेल तितके आपले कुटुंब, आपला समाज आणि आपले राष्ट्र संपन्न आणि समृद्ध होईल.
आज येथे अनेकविध भागातून लेखिका आल्या आहेत. त्यातील काहीजणी स्त्रियांच्या साहित्यात, तर काही किशोर साहित्यात मोलाची भर घालीत आहेत. येथे न आलेल्यांपैकी सोनल खानोलकर पित्याचा साहित्य वारसा जोमाने चालवित आहे. ‘जाणीव’ आणि ‘खतरनाक’ हे दिवाळी अंक म्हणजे त्याची धगधगती साक्ष आहे. स्त्री मनाची स्पंदने टिपणारी, बाल साहित्यात मोलाची भर घालणारी जळगावची माया धुप्पड अतिशय सुंदर गाते हे कितीजणींना ठाऊक आहे. वैचारिक लेखन करताना त्याला आध्यात्मिक उंची प्रदान करणारी नागपूरची डॉ. वसुधा वैद्य... किती म्हणून नावे घेऊ? तुम्हा सर्वांबद्दल मला फार फार प्रेम वाटते. गौरी कुलकर्णीच्या कविता वाचताना मन श्रावणसर होते, तर रेखा नार्वेकरचे ज्ञानेश्वरीवरील निरूपण मला स्तब्ध, आत्मप्रवण करते. माधवी कुंटे यांचे लिखाण मला इतके आवडते कारण ते जीवनस्पर्शी असते, तर डॉ. चारुशीला ओक म्हणजे संशोधनपर लेखनाचा अध्याय. एकेक नाव साहित्य प्रांतातील सुवर्णमुद्रा आहे. आणखीही लेखणीच्या बहाद्दर लेखिका येथेही उपस्थित आहेत. आपापल्या परी प्रत्येकीने आपली समाजप्रबोधनाची जबाबदारी उचलली आहे. मला हे चित्र खूप खूप आशादायी वाटते.
‘भोगले जे सर्व ते ते शब्दरूपे मांडले,
शब्द शब्दांतून सारे दु:ख अवघे सांडले,
घ्यायचा तो बोध घ्यावा अन् कणा हा ताठ व्हावा,
नाही आता गप्प बसणे.. एवढाची बोध घ्यावा !’
एवढे मात्र मनापासून सांगावेसे वाटते. सख्यांनो, परदु:ख शीतल मानू नका, त्याला वाचा फुटू दे.
आपल्याकडे बलात्कार पीडितेचे सांत्वन होते, पण तिच्या पुनर्वसनात आपला वाटा किती? त्या नराधमास शिक्षा व्हावी म्हणून आपण टाहो फोडतो, पण ती पुन्हा ताठ मानेनं उभी राहावी म्हणून आपण सामर्थ्याचं कडं तिच्या कुटुंबाभोवती उभं करतो का? विचार करा गं मैत्रिणींनो याविरुद्ध पेन उचलायचे आहे, कृती करायची आहे, पुनरूत्थानात सक्रिय सहभाग अन् अर्थसाहाय्यही करायचे आहे. मी पुरुषद्वेष्टी अजिबात नाही. अण्णासाहेब कर्वे, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरुषच होते ना? पण स्त्रीने स्वयंसिद्ध व्हावे यासाठी ते धडपडले. आजही समाजातले अनेक अग्रणी पुरुष स्त्रीसाठी म्हणजे तिच्या विकासासाठी हं! धडपडताना आपण बघतोच की !
एकट्या स्त्रीचा अथवा एकट्या पुरुषाचा विकास राष्ट्राचे सामर्थ्य एकांगी करतो. ‘दोहोंचा विकास.. पाडितो प्रकाश, उजळी अवकाश, सामर्थ्याचे’ हेच खरे म्हणून सख्यांनो, त्यांची वेगळी पार्टी, बायांची वेगळी पार्टी असे न करता निडरपणे एकत्र उभे राहूया. विकसित होऊया.
आज जशी गरज बलात्कारित मुली-स्त्री यांच्यामागे उभे राहण्याची, त्यांचे सामर्थ्य वाढविण्याची आहे तशीच एकल पालकत्व, परितक्त्या, कुमारी माता, घटस्फोटिता व विधवा स्त्रियांसाठी अक्षर चळवळ चालवून जनजागृती करण्याची, ठोस कृती करण्याची आणि त्यांच्या समरप्रसंगात त्यांना आश्वासक साथ देण्याची आहे. त्यांचे स्वत:चे जगतानाचे संघर्ष फार वेगळे आहेत. त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी हृदयाचे नाते जोडून त्यांच्या व्यथा शब्दांत मांडूया सख्यांनो. दलितांची दु:खे, समाजाला ज्ञात कोणी करून दिली? पुस्तकांनीच ना?
मी तुम्हाला इतक्या वर्षांच्या वैवाहिक आयुष्याच्या अनुभवावरूनच सांगते, स्वातंत्र्य सहजी हातावर पडत नाही, ते झगडूनच मिळवावे लागते. मीही ते व्यक्तिगत विकासासाठी झगडूनच मिळविले आहे. पुढे घराला त्याची सवय होते. माझ्या आगे-मागे वयाच्या कौटुंबिक नि आर्थिक स्वास्थ्य असलेल्या घरातील स्त्रियांना नोकरी करायची होती, पण कौटुंबिक दबावाने ती करता आली नाही. शिकायचे होते आणखी आणखी, पण ‘पदवीपुढे बस् !’ हे ऐकून त्या आतल्या आत रडल्या. स्त्रीला जोडीदाराचे नुसते शरीर प्रेम पुरत नाही, तिचा श्वास मोकळा असावा, असा जोडीदार ती अपेक्षिते. या साऱ्या घुसमटीला वाचा फुटावी यासाठी तरी लिहा मैत्रिणींनो.
सुखाच्या अध्यायाबरोबरच साहिलेल्या अन्यायालाही वाचा फुटू दे. तुम्ही धडपडून मिळविलेले स्वातंत्र्य शब्दरूपात येऊ दे ना जगापुढे! न जाणो, ते अशाच घुसमटलेल्या विवाहितेची प्रेरणा ठरेल.
माझ्या वयोगटातील एक मैत्रीण वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी गाणे शिकू लागली. का? तर सासऱ्यांना ‘गाणे’ गरती वाटत नव्हते. त्यांच्यापुढे बोलायची तिच्या नवऱ्याची हिंमत नव्हती. तरुण वयात तिचा गाता गळा घोटला गेला. सासरच्यांची मनमर्जी! हे बरेय का?
म्हणून म्हणते, आपणास हवे ते सर्व करण्यासाठी, आपल्या आवडी-निवडींना मुक्तांगण देण्यासाठी एकच मंत्र जपूया ‘स्त्री स्वातंत्र्य अवश्यं अर्हती!’
पण, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याचे भान राहू दे. पुरुष जातीला ब्लॅकमेल करण्यासाठी आपला जन्म नाही. स्त्री विवाहाने दोन घरे जोडते. प्रेम हे अजब रसायन आहे. जगातली सर्वांत मोठी बँक आहे. तेव्हा नको ते सारे डिलीट करून पे्रेमाचा उपहार जगास देऊया.
माझ्या प्रिय सख्यांनो, आजचा हा दिवस सार्थकी लावायचा ठरवलं तर आपण काय करूया? मी साहित्यप्रांताची सप्तपदी आपणास सांगते. सांगू ?
१) आपल्या सोसायटीत वा परिसरात जी मराठी घरे आहेत ती निवडा.
२) प्रत्येकाने दोन पुस्तके विकत घ्या. समजा २५ कुटुंबांत... तर दोनच महिन्यांत ५० पुस्तके महिन्यास २ प्रमाणे होतील. २ महिन्यात १०० ! वा ! आता आपली पुुस्तक पेटी सजली.
३) एका घरी पुस्तक पेटी. वाचक मात्र २५ कुटुंबीय.
४) महिन्यातून एकदा एकत्र जमून २ पुस्तकांचे रसग्रहण करा
५) एक ज्ञानमय हस्तलिखिताची ही सुरुवात असेल.
६) वाचन, रसग्रहण, चिंतन, मनन या पायऱ्यांवर मैत्रीची पायरी लागली का? केवढा आनंद ना? छोट्या वर्तुळातलं जगणं मोठ्या वर्तुळाचं झालं यापरते सौख्य नाही गं सख्यांनो.
७) कधीतरी ‘लेखक’ तुमच्या भेटीला बोलवा. इतकी मजा येते ना. मीही अवश्य येईन. तुमचे अनुभवविश्व समृद्ध होईल बघा!
आधी वाचन समृद्धी नि मग लेखनानंद !
कचरु नका. मागं सरू नका. न्यूनगंड दूर फेका. प्रत्येकीजवळ एक अनुभव विश्व आहे. त्याला स्वत:चे असे कंगोरे आहेत. संसारी स्त्री केवळ चुलीपुरती नाही. तिच्या काळजातला कोलाहल तिनेच न भिता, न संकोचता कागदावर उतरविला पाहिजे. ती पोलिस असेल, वकील असेल, शेती करीत असेल, दूध विकत असेल, वाचनालय चालवित असेल, शिक्षक असेल वा डॉक्टरकीत असेल, भविष्य सांगणारी असेल वा प्रकाशक असेल नाहीतर इंजिनिअर ! प्रत्येकीला सांगायला कितीय नं ? तिचं जग, तिचे अनुभव, तिची हुशारी समयसूचकता, प्रसंगावधान, हार.. जीत... कितीतरी गोष्टी !
माझ्या शिक्षकीपेशाने मला किती श्रीमंत केले त्याला सीमा नाही. ही पैशांची श्रीमंती नसेलही, पण मी किती जीवने ‘वाचली’ नि किती मने माझ्या प्रेमाने प्रदीप्त केली याचा मजजवळ हिशेब नाही. प्रेमाची बँक जप्ती यावी एवढी फुल्ल आहे. ‘एकटं वाटलं’ म्हणून जेव्हा एखादा विद्यार्थी वा विद्यार्थिनी तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही प्रेमाचा आश्वासक ‘थांबा’ आहात हे ध्यानी घ्या. एखादा छोटा- मोठा आनंद तुमच्यासंगे वाटावासा त्यांना वाटतो. तेव्हा तुम्ही त्यांचा ऊर्जेचा स्रोत आहात हे समजून घ्या. माझ्या एका विद्यार्थिनीची गोष्ट सांगते नि थांबते सख्यांनो. दहावीचा निबंध विषय मी दिला होता ‘मी हुंडाबळी होणार नाही’ हिने दोनच ओळीचा निबंध लिहिला.
माझे मुळी लग्नच होणार नाही, तेव्हा मी हुंडाबळी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तिस माझ्या केबिनमध्ये बोलावले. प्रश्न विचारला का गं? का नाही तुझे लग्न होणार? सख्यांनो, मुलगी कृष्णसावळी होती. म्हणाली, ‘आईच म्हणते कलर फास्ट आहे. लग्न होणं मुश्कील.’ 
मला फार वाईट वाटलं. मी कॅलिग्राफी फार सुंदर करणाऱ्या त्या मुलीस तिचा पत्ता विचारला. सायंकाळी घरी गेले. सख्यांनो, तिचे आई, बाबा, भाऊ सारेसारे गोरेपान नि ही तेवढी काळी! का काळी ? तिच्या हाती होते का ते ? जीन्स आर द फंक्शनल फॅक्टर्स आॅफ हेरिडिटी. असेल कोणी पूर्वज काळा किंवा काळी. ते काळेपण तिच्याकडे आले. मी आईशी बोलले. आई रडत म्हणाली, लोक बेजार करतात हो. ही कशी काळी? मुलगी जखमी झाली. म्हणाली, ‘आई, मी तुजबरोबर कुठे येते का? का हिने पंधराव्या वर्षी कवचात जावे? मी अस्वस्थ झाले. तिला बाहेर काढले. म्हटले, रंग ही काही इतकी जीवघेणी का गोष्ट बेटा? सारी लग्ने रंगाशी होत नाहीत. काही गुणांशीही होतात. तुझेही होईल आणि खरं तर लग्न हीच काही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही. शिक आणि स्वयंसिद्ध हो बाळ?’माझी मुलगी इंजिनिअर झाली सख्यांनो. लग्न झालं, मुले झाली! आहे ना एक प्रबल कथानक! साहित्य उमेद वाढवणारे असावे. जगणे ‘माणसाचे’ असावे. ते जगताना हाती हात असावे नि एक दुसरीस गरज पडल्यास ते मदतीसाठी सरसावून उठावेत.
म्हणून म्हणते...
बाई गं, सई गं, आपण सजग व्हायचंय !
माणूस म्हणून माणसासारखं साधसुधं जगायचंय 
आपण देवी नाही.. दासी नाही.. माणूस आहोत
हे सदाकरिता लक्षात ठेवायचंय ..
खूप झालं सोसून पिढ्यान्पिढ्या आता थोडं मोकळं जगूया.
शिकण्यासाठी, चुकण्यासाठी हाती हात धरुया
अंग भुईवरती स्वत:स रोवून, आभाळाला भिडायचंय 
आपण सजग व्हायचंय !
चला तर एकत्र गाऊया मिळून साऱ्या जणी !
‘आम्ही बाया गं आम्ही बाया 
आम्ही मुळीच नाही जाऊ द्यायच्या 
मोलाची जिंदगी वाया ! आम्ही बाया ’
स्त्री शक्ती ही जगातली एक प्रबळ शक्ती आहे, तिचा जयजयकार करूया
 
 

(लेखिका साहित्यिक आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्ष आहेत.)