ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 10 - लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात चाकूर तालुक्यातील सुगाव येथील महिला आरोपी कविता शिवाजी शिंदे हिला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना महिला पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तिने न्यायालय परिसरातून पलायन केले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून, ती अद्यापही सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असली, तरी पोलिसांनी मात्र याबाबतची माहिती दडवून ठेवली होती. कविता शिवाजी शिंदे ही महिला मूळची सुगाव (ता. चाकूर) येथील आहे. लातूर शहरानजीक बाभळगाव रोडवर ती सध्याला राहत होती. तिने आपल्याच भावाच्या लहान मुलीस डागण्या देऊन विद्रुप करून तिला भीक मागण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी तिच्या विरोधात ३६३ (क) ३४ आणि बाल अत्याचार कलम ७६ नुसार लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला लातूर ग्रामीण पोलिसांनी २८ जुलै २०१६ रोजी अटकही केली होती. तेव्हापासून तिचा जामीन झाला नाही. तेव्हापासून जिल्हा कारागृहात नांदगाव येथे बंदिस्त आहे. या महिलेस न्यायालयीन कामकाजाची शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आणले. २.४५ वाजता कविता शिंदे हिला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना महिला पोलिसांच्या हाताला हिसका मारून तिने न्यायालय परिसरातून पलायन केले. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी याबाबत माध्यमात वाच्यता होऊ नये, यासाठी महिला आरोपी पलायनाची माहिती दडवून ठेवल्याचे मंगळवारी उघडकीस आले.
अहवालानंतर कारवाई... लातूर जिल्हा न्यायालयातून महिला आरोपीने पलायन केलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांना दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर यातील दोषी पोलीस कर्मचा-यावर कारवाई करू, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी दिली.