बारामती : जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ महिलाच आहेत. स्त्री कुटुंबाचा कणा असते. स्त्री एक चांगली आई असते. कारण कुठल्याही आईला जर विचारले, की तुला आयुष्यात काय करायचे आहे. तेव्हा ती म्हणते, मला माझ्या मुलांना शिकवायचे आहे. ती त्यासाठी काटकसर करते, प्रसंगी तडजोड करते. एक स्त्री शिकली, की कुटुंबाची प्रगती होते. ‘स्वयंसिद्ध व्हा’ हा संदेशच या युवती संमेलनातून मिळतो आहे, असे मत रुरल रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी युवतींना मार्गदर्शन केले. प्राचार्य राजकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात स्वयंसिद्धा युवती संमेलनात चार दिवसांच्या चाललेल्या संमेलनाचा आढावा घेतला. युवतींना संमेलनाला पाठविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम व सर्व महाविद्यालयांच्या प्रचार्य, प्राध्यापक व पालकांचे आभार मानले. प्रा. आर. एस. लोहकरे यांनी स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या कार्यक्रमाचे अहवालवाचन केले. स्वयंसिद्धा युवती संमेलनातील सर्वोतकृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालायाची गीता काकासाहेब मुळे, सासवडच्या वाघिरे महाविद्यालयाची भावना मंगेश बोरकर, शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालायाची पूजा विलास पंदरकर यांची निवड करण्यात आली. त्यांना सुनंदा पवार, प्रदीप लोखंडे, प्राचार्य डॉ. आर. जी. पवार यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांनी दीपोत्सवाचे संचालन केले व स्त्री-भ्रूणहत्या न करण्याचा संकल्प करण्यास सांगितले. प्रत्येकाने अंतरीचा दिवाही प्रज्वलित ठेवावा, असे आवाहन केले. या वेळी स्वयंसिद्धा संमेलनातील युवती व सर्व उपस्थितांनी पणती प्रज्वलित केली. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताने सभागृहातील वातावरण भारावून गेले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महिलाच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ
By admin | Published: December 22, 2016 1:40 AM