मुंबई- आर्थिक फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाद मागायला आलेल्या मिताली कांबळे यांना आयोगाच्या जलद कार्यवाहीने हक्काचे १४ लाख परत मिळाले आहेत.मुंबईत राहणाऱ्या मिताली महेंद्र कांबळे (वय ५० वर्षे), त्यांचे पती महेंद्र कांबळे बेस्ट मध्ये कार्यरत होते. पतीच्या निधनानंतर मिताली आपलं दुःख आवरत आपल्या दोन मुलांकडे पाहत जगत होत्या. पतीच्या जाण्यानंतर हक्काचे पैसे त्यांनी बेस्ट कार्यालयात फेऱ्या मारून मिळवले. जी काही रक्कम मिळाली ती भविष्याच्या तरतुदीसाठी ठेवली. दोन्ही मुलं शिक्षण घेणारी, त्यांच्या शिक्षणासाठी पतीच्या निधनानंतर काही महिन्यांनी मिळालेल्या रकमेतून तरतूद करावी म्हणून बँकेत पैसे काढायला गेल्या आणि आपल्या खात्यावर पैसेच नाही हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्याकडे नावावर असलेल्या चेकबुक मधूनच पैसे काढण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर मिताली यांच्या दीराने बेस्टमधून लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू तसेच भविष्यात सहकार्य करू अस सांगत मिताली आणि स्वतःच्या नावावर संयुक्त खाते बँकेत उघडले होते. आणि त्यातूनच सहीचा, खाते चालवण्याचा अधिकार मिळाल्याने मिताली यांच्या नकळत बँकेतील रक्कम परस्पर काढून घेतली. दिराला याबाबत विचारणा करायला गेलेल्या मिताली यांना आणि त्यांच्या मुलांना हाकलून लावण्यात आले.बेस्ट प्रशासनाने धनादेश पत्नीच्या नावे दिला होता तसेच बँकेचे खाते ही संयुक्त होते त्यामुळे कायदेशीरदृष्टया त्यांना न्याय मिळणे कठीण होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे मिताली यांनी दाद मागितली. दिराने काढून घेतलेली बँकेतील रक्कम खर्च करण्याआधीच याप्रकरणी दखल घेणे गरजेचे होते. त्यामुळे संबंधित नातेवाईकांना तातडीने आयोगात उपस्थित राहण्यास सांगून समज देण्यात आली. आयोगाच्या कारवाईचा धसका घेऊन संबंधित नातेवाईकांनी १५ दिवसात आयोगाच्या कार्यालयातच समुपदेशकांच्या समक्ष मिताली कांबळे यांना त्यांचे १२ लाख धनादेशाद्वारे परत केले असून उर्वरित २ लाख लवकरच परत करणार आहेत.'कायद्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी लढू शकले नसते मात्र आयोगातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशील आणि जलद हा विषय मार्गी लावल्याने न्याय मिळाला, मी ऋणी आहे' अस सांगत मिताली यांनी आयोगाचे आणि अध्यक्षा विजया रहाटकर यांचे आभार मानले आहेत.
दिराकडून फसवणूक झालेल्या मिताली कांबळेना महिला आयोगाने मिळवून दिला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 5:24 PM