ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - राज्य महिला आयोगाने अभिनेता सलमान खानला समन्स बजावले असून २९ जून रोजी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुल्तान चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कुस्तीमुळे एखाद्या बलात्कार पिडीतेसारखी अवस्था व्हायची, असे वादग्रस्त विधान सलमान खानने केल्याने वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून सलमानवर टीका होत आहे. या विधानाची गंभीर दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी समन्स बजावला.दरम्यान गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सलमानच्या विधान अनुचित असल्याचे म्हटले आहे. महिला आयोगाकडून सलमानच्या विधानाची तपासणी करण्यात येत असून त्यानंतर योग्य ती कारवाई येईल. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सलमानला टीकेचे लक्ष्य केले आहे. बलात्काराच्या विधानाबाबत जोपर्यंत सलमान खान बिनशर्त माफी मागत नाही तोपर्यंत त्याच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी शिवसेना प्रवक्तया मनिषा कायंदे यांनी केली आहे. स्वत:ला सुपरस्टार म्हणविणारा सलमान खान सुरुवातीपासून विध्वंसक वृत्तीचा आहे. यापूर्वी हरिणांची शिकार, महिलांवर हात उचलणे, फुटपाथवर बेदरकारपणे गाडी चालवून लोकांचे जीव घेण्याच्या प्रकरणी सलमान गोत्यात आला होता. त्यामुळे स्वाभिमानी महिलांनी त्याच्यावर बहिष्कार टाकावा, असे कायंदे म्हणाल्या.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने सलमानच्या घराबाहेर निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. तर, राजकीय फायद्यांसाठी सलमानसारख्या लोकांना डोक्यावर घेतले जाते. त्यातून स्टारडमचे फॅड आणि अतिरेक वाढत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केली. सलमानने अलीकडेच निवडणुकीत काही नेत्यांसाठी प्रचार केला होता. खुद्द नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१४ साली गुजरातच्या मुख्यमंत्री असताना सलमानसोबत पतंग मोहत्सवात पतंगबाजी केली होती. मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असतानाही सलमान पहिल्या रांगेत होता. या प्रकारांमुळेच स्टारडमचे फॅड वाढत असल्याचे पावसकर म्हणाले. तर, सलमानच्या विधानाबाबत सलीम खान यांनी माफी मागितल्याने हा विषय आणखी वाढविण्यात अर्थ नसल्याचे काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले. सलमानचे विधान महिलांचे अपमान करणार आहे. बोलण्यापूर्वी सलमान कसलाच विचार करत नाही त्यामुळे तो सतत वादग्रस्त विधाने करीत राहतो, असे दलवाई म्हणाले.
महिला आयोगानं सलमानला बजावले समन्स
By admin | Published: June 22, 2016 9:47 PM