ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पडूकोणचा 'माय चॉईस' हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये महिलांबद्दलची पुरूषांची संकुचित मनोवृत्ती बदलण्यासंबंधी आवाज उठवण्यात आला असून बॉलिवूडमधील अनेक कलाकार या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शबाना आझमींसारख्या दिग्गज कलाकारांनी दीपिकाच्या व्हिडीओचे कौतुक केले असले तरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला मात्र तो फारसा आवडलेला दिसत नाहीये. हा व्हिडीओ महिला सक्षमीकरणावर केंद्रित असला तरी महिलांचे सक्षमीकरण म्हणजे व्यभिचार अथवा विवाहबाह्य संबंध नव्हे असे सोनाक्षीने म्हटले आहे.
सोनाक्षीने अद्याप हा व्हिडीओ पाहिला नसला तरी त्याबाबत तिने तिचे मत मांडले आहे. 'महिलांचे सक्षमीकरण म्हणजे त्यांना रोजगार आणि ताकद देणे. शारीरिक संबंध किंवा कोणते कपडे घालावे याच्याशी त्याचा संबंध नाही' असे सोनाक्षीने म्हटले आहे. 'ज्या महिलांना खरी गरज आहे त्यांचेच सक्षमीकरण व्हायला हवे. सुखी, समृद्ध जीवन जगलेल्या महिलांना त्याची गरज नाही' असे मतही तिने नोंदवले आहे. मात्र असे असले तरी या व्हिडीओद्वारे एक चांगले पाऊल उचलण्यात आल्याचे सोनाक्षीने मान्य केले असून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत तो विचार पोहोचला पाहिजे असेही तिने म्हटले आहे.
'माय चॉईस' या व्हिडीओत दीपिकाने पुरूषांना महिलांविषयीची संकुचित मनोवृत्ती बदलण्याचे आव्हान केले आहे. 'मी माझ्या मनाला वाटेल तसे जीवन जगू शकते. मला पाहिजेत तसे कपडे घालू शकते, लग्न कधी करावे हेही मीच ठरवेन', असे या व्हिडीओत म्हटले आहे.