मुंबई : एसटी आणि शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांना पुढची सीट देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला असतानाच आता आरटीओत लर्निंग लायसन्ससाठी (शिकाऊ) महिलांना स्वतंत्र वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे आदेशही परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ४ ही वेळ महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहे. ज्या महिलांना ही वेळ अनुकूल वाटते त्या महिला या वेळेत लर्निंग लायसन्साठी आरटीओत जाऊ शकतात, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. प्रवासात महिला प्रवाशांशी लगट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे एसटी किंवा शेअर टॅक्सीतून प्रवास करताना महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते. हे पाहता एसटी किंवा शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांना पुढची सीट आरक्षित ठेवण्याचा निर्णय परिवहन मंत्री रावते यांनी घेतला. यामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षित प्रवास हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबरोबरच राज्यातील आरटीओतही लर्निंग लायसन्सची आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या महिलांना स्वतंत्र वेळ देण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी आॅनलाइन परीक्षा आरटीओत द्यावी लागते. ही परीक्षा देण्यासाठी प्रथम वेळ घ्यावी लागते आणि वेळ मिळाल्यानंतर आरटीओत गेल्यावर लांबच लांब रांगांना सामोरे जावे लागते. लर्निंग लायसन्सची आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पुरुषांबरोबर एकाच रांगेतून महिलांनाही परीक्षेसाठी जावे लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे काही महिलांना तर कामे सोडून दिलेल्या वेळेनुसार आरटीओत यावे लागते. त्यामुळे महिलांना दुपारी २ ते सायंकाळी ४ ही वेळ निश्चित करण्यात आली असून स्वतंत्र रांगही असेल. (प्रतिनिधी)
लर्निंग लायसन्ससाठी महिलांना स्वतंत्र वेळ
By admin | Published: January 29, 2015 5:48 AM