ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अद्यापही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. मुंबईत लाखो चाकरमानीरेल्वेने प्रवास करतात. वाहतूक आणि दळवळणाच्या प्रमुख साधनांपैकी एक असलेली, मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणा-या रेल्वेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्याची किती आश्वासने दिली गेली, मात्र ते दावे फोल ठरतानाच दिसत आहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने होणारे अपघात. असाच एक अपघात काल रात्री पश्चिम रेल्वेच्या एलफिस्टन स्थानकाजवळ घडला. स्थानकावरून गाडी सुटताच अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला व तो लागून एक महिला जखमी झाली. काल रात्रीही घटना घडली. प्रचंड गर्दीमुळे दारात लोंबकळावे लागलेल्या महिलेला तो दगड लागला आणि ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी सायनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.