पिंपरी : राज्यातील विविध शहरांमधील कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये महिला रुग्णांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी, कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला सुरक्षित नाहीत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने दिनांक २२ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी दिली.
उमा खापरे म्हणाल्या,‘‘राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिला असुरक्षित आहेत. त्याठिकाणी महिलांवर अत्याचार व छेडछाड केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करूनदेखील त्यांनी याची दखल घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक प्रशासनालाही महिलांच्या सुरक्षेबाबत काही देणेघेणे नाही. यातून सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या विरोधात उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना भाजप महिला मोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे.’