सेनेकडून महिला नेत्या उपेक्षित; काँग्रेसच्या ठाकूर, गायकवाड अन् राष्ट्रवादीच्या तटकरेंना मंत्रीपद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:37 PM2019-12-30T12:37:22+5:302019-12-30T12:39:06+5:30
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
मुंबई - राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी मंत्रीपद निश्चित झाली नाहीत. या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काहींना डच्चू मिळाला आहे. काँग्रेसकडून मंत्रीमंडळात दोन महिला नेत्यांना संधी दिली असून शिवसेनेने महिला नेत्यांना सपशेल डावलले आहे. तर राष्ट्रवादीने अदिती तटकरे यांना संधी दिली आहे.
खुद्द काँग्रेसनेते राहुल गांधी यांनीच महिलांना पक्षात अधिक संधी देण्यात येईल हे स्पष्ट केले होते. त्याचा प्रत्येय महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ विस्तारात येत आहे. काँग्रेसवर निष्ठा ठेवून पक्षाचं काम करणाऱ्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीत मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी पक्षातून सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून महिला नेत्या पुन्हा एकदा उपेक्षित राहिल्या आहेत. युती सरकारमध्ये देखील शिवसेनेकडून एकही महिला नेत्याला संधी देण्यात आली नव्हती. तर भाजपने दोन महिलांना मंत्रीपदाची संधी दिली होती.
दरम्यान काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.