राहुरी : म्हैसगाव येथे दारुविक्रीला विरोध करणाऱ्या महिला सरपंचावर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हैसगाव येथे महाराष्ट्र दिनी दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तेथे दारूविक्री सुरूच आहे.शनिवारी सरपंच सुजाता पवार यांच्यासह काही महिला दारुविक्रीला विरोध करण्यासाठी व्यावसायिकांकडे गेल्या होत्या. एका ठिकाणी महिलाच दारुविक्री करीत होती. तेव्हा सरपंच व इतर महिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू एक महिला आहेस. दारुविक्रीचा व्यवसाय बंद कर. तुला दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही मदत करू, अशी ग्वाही सरपंच पवार यांनी दिली. परंतु त्याचा राग आल्याने दारुविक्रेत्या महिलेने पवार यांच्यावर अॅसिड फेकले. त्यात त्यांच्या साडीने पेट घेतला तसेच त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर संतप्त महिलांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आशू भोकरे या महिलेविरुद्ध तक्रार दिली.एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात दारुबंदीसाठी व्यापक प्रयत्न होत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत तब्बल अर्ध्या जिल्ह्यात दारुबंदीचे ठराव झाले. परंतु त्यानंतरही अनेक ठिकाणी सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. (प्रतिनिधी)
दारूला विरोध केल्याने महिला सरपंचावर अॅसिड हल्ला
By admin | Published: May 18, 2015 3:39 AM