सोमनाथ खताळबीड : ललिता होते तेव्हा आतून पुरुषाच्या भावना असल्या तरी स्त्री म्हणूनच जगावे लागले. संस्कारामुळे स्त्री म्हणून जगताना आणि रस्त्याने जाताना लाजत, तोंडाला बांधून खाली मान घालून जावे लागत होते; परंतु आता मला नवीन जीवन मिळाले असून, आज मी त्याच रस्त्याने ताठ मानेने जात आहे. मी महिला म्हणून जीवन जगलो आहे.
खूप बंधने असतात. अशा परिस्थितीत वागताना महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. मी पण अशाच संघर्षातून आलो असल्याची भावना ‘ललिता’ म्हणून आयुष्य जगलेल्या ललित साळवेने व्यक्त केली.
ललित साळवे सांगतात, लहानपणी मला याबद्दल काहीच माहिती नव्हते; परंतु जसे शिक्षण वाढत गेले आणि नोकरीला रुजू झालो, तेव्हापासून माझ्या शरीरातील हार्माेन्स बदल जाणवू लागले; परंतु मी हे कोणाला बोलू शकत नव्हतो. भारतीय संस्कृतीप्रमाणे मुली, महिला जशा वागतात, तसाच मीसुद्धा वागलो. रस्त्याने जाताना मुलांचे टोळके असायचे. ते टाँट मारतील, अशी भीती असायची. लाजत, खाली मान घालून जावे लागत होते. प्रत्येकाला इभ्रत महत्त्वाची असते. तशीच मलाही होती. मी स्त्री आणि इभ्रत या दोन्ही गोष्टींना कधी बाधा पोहचेल, असे वागलो नाही. प्रत्येक वेळी सहकारी, महिला, मैत्रिणींचा सन्मान केला. माझ्यावर २५ मे २०१८ रोजी पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तेव्हासुद्धा माझे बोलणे स्त्रीसारखेच होते. तिसरी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मला डॉक्टरांनी विचारले, आता कसे वाटत आहे, यावर मी म्हणालो ‘मी बरा आहे.’ हे माझे पुरुष म्हणून पहिले शब्द होते. तेव्हापासून मी पुरुषाप्रमाणे बोलतो, वागतो आणि भावनाही तशाच आहेत. पुरुष म्हणून पुन्हा पोलीस दलात रुजूही झालो. मला दुचाकी घ्यायची होती. भाऊ म्हणाला, मुलींना मोटारसायकल नसते, स्कूटी असते. लोक नाव ठेवण्याची त्याला भीती होती, अशीही आठवण ललित याने सांगितली.