मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ केला जाणार आहे. पुण्यातून सुमारे १५००० महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर महिलांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जात आहे, याचा मेसेज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. आज या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी इथे होणार आहे.
राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना मेसेज केले जात आहेत. हे मेसेज अन्य ग्रुपवरही फॉरवर्ड केले जात आहेत. हा मेसेज सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये ज्या महिलांना अॅप्रूव्ह असा मेसेज आलेला आहे त्या कायक्रमाला न आल्यास त्यांचा फॉर्म रद्द केला जाणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. यावर सुळे यांनी टीका केली आहे.
''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला 'भाऊ' म्हणवितात आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.'', असे आव्हान सुळे यांनी दिले आहे.