मुंबई : स्कूल बसमधून ने-आण करताना शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यात खास करून मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने समोर येत असल्याने, स्कूल बस चालवण्यासाठी महिला चालकही नेमण्याचा परिवहन विभागाकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘लोकमत’ने ‘रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून वाहतूक होताना, नियमांना हरताळ फासला जात असल्याचे उघडकीस आणले. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बोलताना रावते यांनी ही माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्कूल बस मुंबईत धावतात. मात्र, परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम स्कूल बस चालक व मालकांकडून केले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. या संदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विचारले असता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे आणि परिवहन विभागाकडून सुरक्षेसंदर्भातील नियम न पाळणाऱ्या स्कूल बसविरोधात कारवाई होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्कूल बसच्या नियमावलीचे पालन करण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. शाळांकडून, तसेच स्कूल बस चालक-मालकांकडून त्याचे पालन केले जाते का? याची पाहणी शिक्षण विभागानेही केली पाहिजे. त्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोेबत अनेक विचित्र घटना घडल्या आहेत, त्या संतापजनक आहेत. त्यामुळे स्कूल बसमधून त्यांची ने-आण करताना सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असल्याने, बस चालवण्यासाठी महिला चालक नेमता येणे शक्य आहे का? याचा विचार आपण गांभीर्याने करत असल्याचे रावते यांनी सांगितले. असे झाल्यास सगळेच प्रश्न सुटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाची बाब म्हणजे, व्हॅन आणि रिक्षांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होताना नियमांची पायमल्ली होत असल्याने त्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)>चार अवैध वाहनांवर कारवाईसेंट मेरी, सेंट पीटर या माझगावमधील शाळांमध्ये सुुरू असलेली विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक ‘लोकमत’ने रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून समोर आणली. त्यानंतर, भायखळा वाहतूक पोलिसांनी या शाळांच्या आवारात जाऊन या बसवर धडक कारवाई केली. या स्कूल बस खासगी ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत होत्या. या स्कूल बसच्या चार ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्याचे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एसटीची भूमिका चोखग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी एसटी हीच स्कूल बस आहे आणि एसटी आपली भूमिका योग्यपणे बजावत असल्याचे प्रशस्तिपत्रक रावते यांनी दिले.
महिलाही स्कूल बस चालवणार!
By admin | Published: June 28, 2016 4:19 AM