नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीचा २३ वर्षांपासून सुरू असलेल्या एकतर्फी कारभाराचा अस्त झाल्यानंतर सुरू झालेल्या नव्या पर्वाचा सरपंच कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सरपंचपदासाठी सहा महिला इच्छुक आहेत. ग्रामपंचायतीचा वीस महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने दोन महिलांना दोन टप्प्यांत सरपंचपद मिळण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते़सरपंच जयश्री मेहेत्रे यांच्यावर दि़ २ जून रोजी १३ विरुद्घ १ मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता़ अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर २३ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या राजकीय अस्तित्वाला १३ सदस्यांनी धक्का दिला आहे़ उपसरपंच संतोष पाटे, माजी सरपंच व सदस्या ज्योती दिवटे, माजी उपसरपंच व ज्येष्ठ सदस्य संतोष वाजगे, योगेश ऊर्फ बाबू पाटे, आशिष माळवदकर, संध्या तिकोणे, रमेश पांचाळ, सीमा बोऱ्हाडे, संध्या रोकडे, अंजली खैरे, माधुरी वालझाडे, रामदास अभंग, गणेश पाटे आदी १३ जणांनी ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक करण्यास प्रारंभ केला आहे. आता सरपंच कोण होणार? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे़ सरपंचपदाच्या रेसमध्ये ज्योती दिवटे, संध्या तिकोणे, सीमा बोऱ्हाडे, संध्या रोकडे, अंजली खैरे या सदस्या आहेत. यापैकी सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीचा कालावधी २२/२/२०१८ पर्यंत असल्याने सरपंचपद दोन महिलांना दोन टप्प्यांत देण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सर्वपक्षीय सदस्य एकत्र आल्याने नारायणगाव ग्रामपंचायतीचा कारभार पुढील काळात चांगला होईल अशी अपेक्षा नारायणगाव ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे़ राष्ट्रवादीचे युवानेते अतुल बेनके व शिवसेनच्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी यशस्वी खेळी करून कोऱ्हाळे यांच्या अस्तित्वाला धक्का दिलाच शिवाय ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी झाले़ नवीन सरंपच बेनके व बुचके यांच्या मर्जीतीलच राहणार हे स्पष्ट आहे़ नारायणगावची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे ती व्यक्ती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रबळ राहते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सत्तेचा लाभ पुढे बेनके व बुचके यांना होणार आहे़
महिलांना सरपंचपदाची शक्यता
By admin | Published: June 10, 2016 1:33 AM