ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - जागतिक महिला दिनाच्या दिवशी पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे. नीरू वाधवा आणि राधा अय्यर या दोन महिला मुंबई-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्याचे काम करणार आहेत.
पूर्वी पश्चिम रेल्वेवर उपनगरी लोकल ट्रेन्सच्या महिला कम्पार्टमेंटमध्ये किंवा प्लॅटफॉर्मवरच महिला टीसी होत्या. मात्र जागतिक महिला दिन म्हणजे 8 मार्चपासून महिला तिकीट तपासनीस आता पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये दिसणार आहेत.
दरम्यान, तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
हा प्रयोग राबवण्यात यश आल्यास आणखी महिला टीसींची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 20 महिला टीसींची निवड करण्यात आली असून या महिलांना नोव्हेंबरपासून मुंबई-सुरत इंटरसिटीमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते. ऑन फील्ड ट्रेनिंगच्या आधी त्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं. सध्या हा प्रयोग रेल्वेच्या प्रथम वर्ग डब्यात राबवण्यात येत आहे. यानंतर भविष्यात स्लीपर क्लास आणि जनरल डब्यातही महिला टीसींची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.