गिरीश गोरेगावकर माणगाव : गृहिणींपासून अवघ्या काही दिवसांपूर्वी लेफ्टनंट जनरलपदी नियुक्त झालेल्या माधुरी कानिटकरांपर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यात माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील साळवे येथील प्रिया तेटगुरे हिचा आवर्जून उल्लेख व्हायला हवा. नुकतीच तिची कोकण रेल्वेचालक पदावर नियुक्ती झाली आहे. प्रिया कोकण रेल्वेतील पहिली महिला चालक ठरली आहे.
कडेकपारीतून धावणाºया आणि उंचच उंच पुलांवरून धडधडत जाणारी कोकण रेल्वे सर्वांच्याच मनात धडकी भरवते. ती चालविणे म्हणजे एक आव्हानच आहे. मात्र प्रियाने हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. प्रियाचे वडील माणगाव रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. प्रियाने रत्नागिरीतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयातच ती नोकरीवर रूजू झाली. त्यानंतर तिने रेल्वे चालकाचे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच कोकण रेल्वेचे सारथ्य करण्याची संधी तिला मिळाली.जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साळवे गावची सुकन्या प्रिया बाबूराव तेटगुरे कोकण रेल्वेत इंजीन चालक झाली आहे. याचा सर्व कोकणवासीयांना अभिमान वाटत असून सोशल मीडियावर सध्या या कोकणकन्येचे जोरदार कौतुक होत आहे.