पुणे : कृतिशील पत्रकारितेत आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविणा-या महिलांना राष्ट्रीय स्तरावरील ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि राज्यस्तरावरील ‘सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार ‘शाश्वत’ संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी काम करणाऱ्या कुसुमताई कर्णिक यांना, तर कार्यगौरव पुरस्कार नक्षलग्रस्त गडचिरोलीत ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या माध्यमातून आरोग्यासाठी काम करणाऱ्या शुभदा देशमुख यांना प्रदान केला जाणार असल्याची घोषणा ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी आज येथे केली. खासदार दर्डा म्हणाले, ‘‘विधायक आणि आक्रमक पत्रकारिता करताना ‘लोकमत’ने सामाजिक, सांस्कृतिक भान ठेवले आहे. सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ‘लोकमत सखी मंच’ माध्यमातून महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ देत परिवर्तनाला साथ दिली. त्यांच्या नावाने ‘सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे आणि सेवाभावी कार्याची ज्योत आयुष्यभर तेवत ठेवणाऱ्या ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येत आहे.
‘लोकमत’तर्फे होणार उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा गौरव
By admin | Published: December 02, 2014 2:46 AM